माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर: जिल्ह्यात पावसामुळे झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले आहेत. पावसामुळे झालेल्या नुकसानी बाबत संबंधितांना तात्काळ दिलासा द्या आणि नदीकाठच्या गावामध्ये आवश्यक तिथे मदतकार्य पोहोचवण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
जिल्ह्यात दोन दिवसापासून सर्वदूर मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. या पावसात शेतपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याबाबत, जिल्हा प्रशासनाने तालुका आणि गाव पातळीवर सूचना देऊन तात्काळ पंचनामे करावेत आणि नुकसानीचा अहवाल तात्काळ राज्य शासनाकडे पाठविण्याच्या सूचना त्यांनी केल्या.
पालकमंत्री श्री. मुश्रीफ यांनी या आपत्कालीन परिस्थितीत यंत्रणेला सतर्क राहण्याच्या सूचना केल्या. शेती, पिके, मालमत्ता नुकसानीचे पंचनामे गतीने करा. कोणत्याही प्रकारची मनुष्यहानी होणार नाही, यासाठी सतर्क राहण्याची गरज आहे. अतिवृष्टी, वादळी पावसामुळे शेतीचे, पिकांचे नुकसान याबाबत तसेच घरांची पडझड, मालमत्तांचे नुकसान या सर्वांचे पंचनामे करावेत, असे निर्देश त्यांनी दिले आहेत.
परतीचा पाऊस आणि कमी दाबाच्या पट्टयामुळे राज्यात सर्वदूर अशी वादळी पावसाची परिस्थिती निर्माण झाली आहे. जिल्ह्यात गेल्या दोन दिवसापासून सतत पाऊस पडत आहे. धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरु आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावातील नागरिकांची काळजी घेण्याच्या सूचना त्यांनी केल्या आहेत. जिल्हा स्तरावरील आपाती व्यवस्थापन कक्ष आणि तालुका स्तरावरील यंत्रणांनी सतर्क राहण्याच्या सूचना ही पालकमंत्री श्री. मुश्रीफ यांनी केल्या.
Post a Comment