माय अहमदनगर वेब टीम
जळगाव : जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील बोरखेडा शिवारातील एका शेतातील घरात अज्ञातांनी चार चिमुकल्या भावंडांची निर्घृणपणे हत्या केल्याच्या घटनेमुळे अवघा जळगाव जिल्हा हादरला. ही खळबळजनक घटना आज शुक्रवारी (ता. १६) सकाळी उघडकीस आली.
पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, जळगाव जिल्ह्यातील रावेर शहरापासून काही अंतरावर बोरगाव शिवारात शेख मुश्ताक यांचे शेत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून शेख यांच्या शेतात मयताब भिलाला हे आपली पत्नी, दोन मुली आणि तीन मुलांसोबत राहतात. नातेवाइकांच्या दशक्रिया विधीसाठी भिलाला हे पत्नी आणि एका मुलासह मध्य प्रदेशात १५ ऑक्टोबर रोजी गेले होते. बोरगाव येथे त्यांची दोन मुले आणि दोन मुली हे घरीच होते. शुक्रवारी सकाळी शेतमालक शेख मुश्ताक हे शेतात आल्यावर त्यांना घर बंद दिसले. त्यामुळे त्यांनी आवाज देत डोकावून पाहिले असता, त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. कारण घरात भिलाला यांची चारही मुले सविता (वय १४), राहुल (वय ११), अनिल (वय ८) व नाणी (वय ५) हे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले होते.
कुऱ्हाडीने वार करत चारही भावंडांची निर्घृणपणे हत्या केल्याचे स्पष्ट झाले. ही घटना समोर आल्यानंतर शेख यांनी तातडीने रावेर पोलिसांना माहिती दिली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी लागलीच घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी पोलीस उपअधीक्षक नरेंद्र पिंगळे, पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे पोहोचले. हत्याकांडामागील कारण काय? हे अद्याप समजू शकलेले नाही. पोलिसांनी घटनास्थळी काही लोकांचे जबाब नोंदवले आहेत. परंतु, अद्यापही ठोस कारण समोर आलेले नाही.
Post a Comment