माय अहमदनगर वेब टीम
मॉस्को : करोनाच्या संसर्गाला अटकाव करण्यासाठी रशियाने विकसित केलेली 'स्पुटनिक व्ही' ही लस भारतात दाखल होणार आहे. भारतात या लशीची चाचणी करण्यास परवानगी मिळाली आहे. रशियन डायरेक्ट इनवेस्ट फंड आणि डॉ. रेड्डी लॅबोरेटरीने चाचणी करण्यास परवानगी मागितली होती. रशियाने 'स्पुटनिक व्ही' ही करोनावर लस विकसित केली आहे. ऑगस्ट महिन्यातच या लशीच्या वापराला राष्ट्रपती पुतीन यांनी मंजुरी दिली होती. मात्र, पाश्चिमात्य देशांनी घेतलेल्या आक्षेपानंतर रशियाने मोठ्या प्रमाणावर चाचणी घेण्याची तयारी दर्शवली. भारतातही ही चाचणी डॉ. रेड्डी लॅबोरेटरीकडून पार पडणार आहे. ही लस चाचणी मागील महिन्यातच सुरू होणार होती. मात्र, रशियात लशीच्या पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील चाचणीत सहभागी असलेल्यांची संख्या खूपच कमी होती. याच मुद्याच्या आधारे प्राधिकरणाने भारतात लस घेण्यास नकार दिला होता.नवीन करारानुसार, आता भारतात दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील लशीची मानवी चाचणी पार पडणार आहे. या लस चाचणीत १५०० सहभागी असणार असल्याची माहिती रशियन डायरेक्ट इनवेस्ट फंडने दिली. ही लस चाचणी डॉ. रेड्डी लॅबोरेटरीच्या देखरेखीत पार पडणार आहे. त्याशिवाय लशीला मंजुरी मिळाल्यानंतर लस वितरणाचे अधिकार डॉ. रेड्डी लॅबोरेटरी या कंपनीकडे असणार आहे. रशियाकडून डॉ. रेड्डी लॅबोरेटरीकडे १०० दशलक्ष लस डोसचा पुरवठा करण्यात येणार आहे.रशियात ही स्पुटनिक व्ही लशीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीला सुरुवात झाली आहे. या तिसऱ्या टप्प्यात ४० हजारजणांना लस देण्यात येणार आहेत. त्यातील १६ हजार स्वयंसेवकांना लशीचे दोन्ही डोस देण्यात आले आहेत. नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला या लस चाचणीचे परिणाम समोर येण्याची दाट शक्यता आहे. रशियाने काही दिवसांपूर्वीच आपल्या दुसऱ्या लशीलाही मान्यता दिली आहे.
रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनी ११ ऑगस्ट रोजी या लशीला मंजुरी दिली असल्याची घोषणा केली होती. या लशीला मॉस्कोच्या गामलेया रिसर्च इन्स्टिट्यूटने संरक्षण मंत्रालयासोबत विकसित केली आहे. 'स्पुटनिक व्ही' लस ही सामान्यत: सर्दी निर्माण करणाऱ्या adenovirus या विषाणूवर आधारीत आहे. या लशीची निर्मिती आर्टिफिशल पद्धतीने करण्यात आली आहे. करोनाचा विषाणू SARS-CoV-2 मध्ये आढळणाऱ्या स्ट्रक्चरल प्रोटीनची नक्कल करते. त्यामुळे शरीरात एक रोगप्रतिकारक शक्ती निर्माण होते. लस चाचणीच्या पहिल्या दोन टप्प्यात ही लस अतिशय सुरक्षित असल्याचे आढळले आहे. रशियाची स्पुटनिक व्ही ही लस टोचल्यानंतर ४२ दिवसानंतरही कोणतेही गंभीर साइड इफेक्टस जाणवले नाहीत. त्याशिवाय ही लस २१ दिवसांत शरिरात अॅण्टीबॉडी तयार करण्यास सक्षम असल्याचे नुकतेच समोर आले होते.
Post a Comment