पमाय अहमदनगर वेब टीम
मुंबई - राज्यात काही दिवसांसाठी पुन्हा अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे तुम्ही गाफील राहू नका. नागरिकांनाही गाफील राहू देऊ नका. लोकांना माहिती देत राहा. प्राणाहानी होऊ नये यासाठी नागरिकांना विश्वासात घेऊन स्थलांतराचे काम करा असे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील प्रशासकीय यंत्रणेला अतिवृष्टी व पुरस्थितीत सतर्क राहून काम करण्याचे निर्देश दिले.
मुख्यमंत्र्यांनी आज पुणे, कोकण, औरंगाबाद आणि नाशिक विभागीय आयुक्त तसेच या विभागातील जिल्हाधिकाऱ्यांशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधून पुरस्थितीचा आढावा घेतला. बैठकीस खासदार अनिल देसाई, खासदार विनायक राऊत, मुख्यसचिव संजय कुमार, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, प्रधान सचिव विकास खारगे, कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले, मदत पुनर्वसन आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाचे सचिव किशोरराजे निंबाळकर आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री श्री. ठाकरे पुढे म्हणाले की, मदत पथकाकडून अनेक ठिकाणी पुरग्रस्त नागरिकांचे स्थलांतर करण्यात येत आहे. हे करतांना कोरोनासंदर्भातील उपाययोजनांची काळजी घेण्यात यावी, मास्क, सॅनिटायझर यासारखी सुरक्षा साधने पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून द्यावीत. अजूनही काही दिवसांसाठी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलेला आहे. या पार्श्वभूमीवर आवश्यकतेनुसार भविष्यात करावयाचे स्थलांतर याचेही वेळीच नियोजन करावे, स्थलांतरीत कुटुंबांची काळजी घेण्यात यावी. पूर ओसरल्यानंतर ते पुन्हा त्यांच्या घरी गेल्यास त्यांना तिथे आवश्यक असणारी मदत पुरवण्यात यावी अशा सुचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या. पुराच्या पाण्यामुळे निर्माण होणारे संसर्गजन्य आजार रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना वेगाने हाती घ्याव्यात असेही मुख्यमंत्री म्हणाले.
पूर आणि अतिवृष्टीने शेतपिके आणि मालमत्तेचे जे नुकसान झाले त्याचे वस्तुनिष्ठ पंचनामे करण्याची कार्यवाही तत्काळ सुरु करावी. दुर्देवाने यात जे नागरिक मरण पावले त्यांच्या कुटुंबिंयाना तातडीने आर्थिक मदत देण्याची व्यवस्था करावी, अशा सुचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या.यावेळी संबंधित विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांनी पुरस्थिती आणि झालेले नुकसान, करण्यात येत असलेली मदत आणि उपाययोजना यासंदर्भात विस्ताराने माहिती दिली.
शेती, पिकांच्या नुकसानीबरोबरच पशुधन, घरे, रस्ते, पाणीपुरवठा योजना, वीज पुरवठ्याशी संबंधित बाबी, शाळा, ग्रामपंचायत इमारती, प्राथमिक आरोग्य केंद्र याच्या नुकसानीची माहिती घेऊन पंचनामे तातडीने करण्याच्या सुचनाही बैठकीत देण्यात आल्या.
Post a Comment