माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर : नगर कृषी उत्पन्न बाजार समितेतील २८ गाळेधारक व व्यापारी यांच्यावर राजकीय आकसपोटी होणारी कारवाई थांबवावी, अन्यथा शेतकऱ्यांप्रमाणे व्यापाऱ्यांवरही आत्महत्या करण्याची वेळ येणार आहे. ही सर्व जबाबदारी तक्रारदार व मनपा प्रशासनाची राहील. अशा आशयाचे निवेदन मनपा आयुक्त श्रीकांत मायकलवार यांच्याकडे व्यापाऱ्यांनी आ. संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली भेट घेऊन दिले. आम्ही सर्व व्यापारी वर्तमान पत्रातील गाळे पाडण्याची बातम्यांमधील मजकूर वाचला असता आमची गाळे पाडून टाकण्यात येणार असल्याचे आम्हाला कळाले, तक्रारदार अधिकारी समजून हातात टेप घेऊन बाजार समितीतील गाळ्यांची मोजमाप करीत आहेत तसेच व्यापाऱ्यांवर दहशत व दमदाटी करण्याचे काम सुरु आहे. तरी आम्ही सर्व व्यापारी सांगू इच्छितो की, ही सर्व गाळे रितसर व नियमानुसार घेतलेले आहे. ही सर्व गाळे बाजार समितीच्या जागेवर आहे. बाजार समितीची गाळे भाडे कराराने देण्याबाबत जाहिरात दिली होती. सदर जाहिरात वाचून आम्ही बाजार समितीकडे अर्ज करून डीडीआर समोर करारनामा करुन भाडे कराराने नियमानुसार घेतले आहे. सदर जागेचा आम्ही व्यवसायासाठी वापर करत असून कुठलाही गैरप्रकार आम्ही करत नाही. असे असताना काही तक्रारदार यांच्या राजकारणापायी आम्हास वेठीस धरत असून, गाळे पाडण्याबाबत राजकीय दबाव आणत आहेत.
वास्तविक पाहता व्यावसायिकासोबत कुठलेही राजकारण करण्याचा हक्क तक्रारदारास नाही, हे प्रकरण न्यायप्रविष्ट असून कुठलेही आदेश देण्यात आलेले नाही.
तक्रारदारांना राजकारण करायचे असल्याने त्यांनी थेट राजकीय व्यक्ती म्हणून माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले, आ. अरुणकाका जगताप व भानुदास कोतकर यांच्याशी करावे, त्यात आम्हा व्यापारांचा बळी देऊन आमच्या कुटुंबाचा बळी देऊ नये. वर्तमान पत्रात बातमी आल्यापासून आमच्या घरातील सर्वांची मानसिक अवस्था जीवघेणी झाली आहे. वास्तविक यातील काही तक्रारादारांचे मोठ्या प्रमाणात अतिक्रमण व बेकायेशीर कामे आहेत. परंतु आम्ही यात पडणार नाही. वेळ आली तर आम्ही यांची अतिक्रमणे काढण्याबाबात बेकायदेशीर कामे बंद करण्याबाबत उपोषणाला बसणार असून कुटुंबासह सामूहिक आत्महत्या करु, या घटनेची सर्व जबाबदारी तक्रारदार व मनपा प्रशासनाची राहील. २00६ साली या ठिकाणी कांदा मार्केटचे शेड उभारणीसाठी पणन महामंडळाने निधी उपलब्ध करुन दिला होता. हे मार्केट नगर शहरामध्ये होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी नेप्ती उपबाजारसमिती निर्माण करुन राज्यातील नामांकित असे कांदा मार्केट उभे केले. या ठिकाणीची जागा मोकळी पडल्याने बाजार समितीने उत्पन्न वाढीसाठी कायदेशीर जाहिरात देऊन व्यापारी, आडते व शेतकरी यांना व्यवसायासाठी गरज असल्यास जागेसाठी अर्ज करावा, अशी मागणी केली होती. या जागेवर कुठलेही अतिक्रमण नाही. या परिसरातील कुठल्याही व्यापारी वर्गाची तक्रार नाही. तरी या तक्रारदारांना या व्यापाऱ्यांचे गाळे पाडून स्वत:च्या फायद्यासाठी गाळे घ्यायचे आहेत. यासाठी हा प्रकार सुरु आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीने महापालिकेकडे गाळ्यांच्या मंजुरीबाबत सुधारित प्रस्ताव दाखल केलेला आहे. अशी माहिती व्यापाऱ्यांनी दिली.
आयुक्त यांनी व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळास सांगितले आहे की, कुठल्याही खासगी व्यक्तीला गाळे मोजण्याचा अधिकार नाही, त्यांनी हे कृत्य करु नये.
कायदेशीर बाबीची तपासणी करूनच पुढील कारवाई केली जाईल. न्यायालयात न्यायप्रविष्ठ असल्याने कोविडच्या काळामध्ये ३१ ऑक्टोबर पर्यंत स्थगिती देण्यात आलेली आहे. त्यामुळे कुठलीही कारवाई घाईघाईने केली जाणार नाही. सर्वांना विचारात घेऊनच पुढील कारवाई केली जाईल.
यावेळी आ. संग्राम जगताप, विरोधी पक्षनेता संपत बारस्कर, उबेद शेख, नगरसेवक निखिल वारे, बाळासाहेब पवार, विपूल शेटीया, विनीत पाऊलबुद्धे, अभिजित खोसे, धनेश कोठारी, किरण दर्डा, सौरभ भळगट, भास्कर पवार, सुभाष सोनी, अजित कासलेवाल, आनंद चोपडा, राजेंद्र कोठारी, सूर्यकांत राका, विशाल दाभाडे, वैभव दाभाडे, नितीन शिंगवी, संग्राम सूर्यवंशी आदी व्यापारी उपस्थित होते.
Post a Comment