माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - करोना महामारीचे संकट व त्यामुळे उद्भवलेली परिस्थिती विचारात घेऊन जिल्हयातील सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेने घेतले आहेत. त्यात आता कर्जदार शेतकरी सभासदांना ३ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज शुन्य टक्के व्याजदराने उपलब्ध करून दिले जाणार आहे. तसा क्रांतिकारी निर्णय बँकेने घेतला असून या योजनेचा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन बँकेचे चेअरमन सीताराम गायकर, व्हाईस चेअरमन रामदास वाघ व राज्याचे माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी केले आहे.
जिल्हयातील शेतकऱ्यांना या योजनेतील व्याज सवलतीबाबत संभ्रम निर्माण झाल्याच्या तक्रारी आल्या होत्या परंतु शेतकऱ्यांना जिल्हा बँकेमार्फत हे कर्ज शुन्य टक्के दराने उपलब्ध होणार आहे. शेतकऱ्यांनी नियमित व्याजासह पीक कर्जाचा वेळेत भरणा केला असल्यास त्यापैकी ३ लाख रुपयांपर्यंतच्या कर्जाचे रकमेवर शासनाकडून दिला जाणारा व्याज परतावा हा थेट शेतकऱ्यांच्या बँक खाती जमा होणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
बँकेद्वारे २ टक्के सवलत
जिल्हा बँकेने राबविलेल्या या योजनेच्या संदर्भात माहिती देताना बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रावसाहेब वर्पे यांनी सांगितले की, जिल्हा बँक जिल्हयातील शेतकऱ्यांना प्राथमिक विविध कार्यकारी सेवा संस्थांमार्फत कर्ज पुरवठा करीत असून चालू वर्षी शासनामार्फत मिळणाऱ्या १ लाखापर्यंतच्या पीक कर्जावर ३% राज्य शासन व ३% केंद्र शासनाची व्याज सवलत मिळून शेतकरी सभासदास ०% व्याज दराने पीक कर्ज उपलब्ध होणार आहे. तसेच १ लाखापासून ३ लाखापर्यंतच्या पीक कर्जावर केंद्र शासनाकडून ३% प्रमाणे व राज्य शासनाकडून १% प्रमाणे व्याज सवलत मिळणार आहे. अशी शासनाची एकूण ४% सवलत मिळाल्यावर उर्वरित २% रक्कम जिल्हा बँक आपल्या स्वनिधीतून शेतकऱ्यांना देणार आहे. त्यामुळे ३ लाखापर्यंतचे कर्ज शुन्य टक्के व्याजदराने उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कर्जदार शेतकरी सभासदांनी सेवा सोसायटीकडे १ लाखापर्यंतच्या कर्जावरील ६ टक्के व्याज दराने भरणा केलेली रक्कम व १ लाख ते ३ लाखापर्यंतच्या पीक कर्जावरील ४ टक्के व्याजदराचीच भरणा केलेली रक्कम शासनाकडून व्याज सवलत योजनेअंतर्गत कर्जदार शेतकऱ्यांच्या थेट बँक खाती जमा होणार आहे, असे त्यांनी सांगितले. ते म्हणाले की, १ ते ३ लाखापर्यंतचे पीक कर्ज वसुल करताना बँकेकडून देण्यात येणारी २ टक्के व्याज सवलत वगळून फक्त ४ टक्के व्याजदराप्रमाणे होणारी रक्कम शेतकरी कर्जदार सभासदांकडून वसूल करण्याबाबत सर्व शाखाधिकारी व सेवा संस्थांना सूचना देण्यात आल्या आहेत. कर्जदार शेतकरी सभासदाने पीक कर्ज बाकी भरताना १ लाखापर्यंत ६ टक्के दराने व ३ लाखापर्यंतच्या पीक कर्जाचे ४% प्रमाणेच व्याज प्रथम भरणा करण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.
Post a Comment