बिहारमध्ये शिवसेना 'या' चिन्हावर निवडणूक लढणार



माय अहमदनगर वेब टीम

 मुंबई ; महाराष्ट्र सरकारची विनाकारण बदनामी करणाऱ्या बिहार सरकारचा खोटारडेपणा हाणून पाडण्याची जवाबदारी आता शिवसेनेचा तुतारी वाजिवणारा मावळा पार पडणार आहे. बिहार विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या धनुष्यबाण या निवडणूक चिन्हाला आक्षेप घेत त्यांना बिस्किट चिन्ह देण्यात आले होते. मात्र हे चिन्ह नाकारल्यानंतर शिवसेनेला आता 'तुतारी वाजविणारा मावळा' हे चिन्ह मिळाले आहे. त्यामुळे बिहार विधानसभा निवडणुकीतील प्रचार शिवसेना आता याच मावळ्याच्या माध्यमातून करणार आहे.

बिहारमध्ये नितीशकुमार यांचा जनता दल युनायडेट हा पक्ष सत्तेत असून 'बाण' हे जदयू पक्षाचे निवडणूक चिन्ह आहे. शिवसेनेचेही नेमके धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह असल्याने ऐन निवडणुकीत बाण की धनुष्यबाण असा मतदारांचा गोंधळ होतो. त्यामुळे आमच्या हक्काची मते शिवसेनेला जातात, असा दावा मुख्यमंत्री नितिशकुमार यांनी निवडणुक आयोगापुढे केल्याने निवडणूक आयोगाने शिवसेनेला धनुष्यबाणावर निवडणूक लढविता येणार नसल्याचे आदेश दिले होते.

त्यावर शिवसेनेने निवडणूक आयोगाकडे ट्रॅक्टर चालवणारा शेतकरी, गॅस सिलेंडर आणि बॅट या तीन पर्यायांपैकी एक निवडणूक चिन्ह देण्याची मागणी केली होती. पण यातील तिन्ही चिन्हे आधीच अन्य काही उमेदवारांनी आरक्षित केल्याने निवडणूक आयोगाने शिवसेनेला बिस्कीट हे निवडणूक चिन्ह घेण्याबाबत विचारणा केली होती. मात्र शिवसेनेने आयोगाच्या बिस्कीट हे निवडणूक चिन्ह देण्याच्या निर्णयावर आक्षेप नोंदवणारे पत्र लिहिले होते. त्यावर आता आयोगाने शिवसेनेचा आक्षेप ग्राह्य धरत सिवसेनेच्या मागणीनुसार पक्षाला बिहार विधानसभा निवडणुकीसाठी तुतारी वाजवणारा मावळा हे निवडणूक चिन्ह दिले आहे.


0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post