लढाई सुरूच राहील! कैदेतून सुटताच मेहबुबा मुफ्ती यांचा 'काश्मिरी राग'

 


माय अहमदनगर वेब टीम

श्रीनगर: जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री व पीडीपीच्या नेत्या मेहबुबा मुफ्ती यांची मंगळवारी रात्री कैदेतून सुटका करण्यात आली आहे. कैदेतून सुटताच मेहबुबा यांनी काश्मीरमधील कलम ३७० हटविण्याच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारवर टीकेची तोफ डागली आहे. लढाई सुरूच राहील, अशी घोषणाही त्यांनी केली.

जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० हटविण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतल्यानंतर सार्वजनिक सुरक्षा कायद्यांतर्गत त्यांना अटक करण्यात आली होती. ५ ऑगस्ट २०१९ रोजी त्यांना ताब्यात घेण्यात आलं होतं. त्यानंतर सातत्यानं त्यांच्या कैदेत वाढ करण्यात आली. अखेर १४ महिने व आठ दिवसांनंतर त्यांना सोडण्यात आलं आहे. जम्मू-काश्मीरचे मुख्य सचिव सूचना रोहित कंसल यांनी ही माहिती दिली.

कैदेतून सुटताच मेहबुबा यांनी पुन्हा एकदा 'काश्मिरी' राग आळवला आहे. कलम ३७० हटविण्याचा निर्णय हा एक 'काळा निर्णय' आहे. त्याविरोधात संघर्ष सुरूच राहील, असं त्या म्हणाल्या. मेहबुबा यांनी एक ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात त्या म्हणतात, 'तब्बल एक वर्षाहून अधिक काळानंतर माझी सुटका झालीय. ५ ऑगस्टच्या काळ्या दिवशी भारत सरकारने घेतलेला काळा निर्णय सतत माझ्या मनावर आघात करत होता. जम्मू-काश्मीरच्या जनतेची मनस्थितीही तीच असणार असं मला वाटतं. तो अपमान कोणीही विसरू शकणार नाही.'

केंद्र सरकारने बेकायदा आणि लोकशाही विरोधी पद्धतीने आपला हक्क काढून घेतला आहे, तो पुन्हा मिळवावा लागेल. ज्या काश्मीरसाठी हजारो लोकांनी बलिदान दिले, तो प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न सुरूच राहील, असं त्या म्हणाल्या. 'जम्मू-काश्मीरमधील जितके लोक देशातील विविध तुरुंगांत आहेत, त्यांची लवकरात लवकर सुटका केली जावी, अशी मागणीही त्यांनी केली.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post