काठमांडू - चीनने नेपाळच्या हद्दीतील हुमला या भागात आपला जम बसविला असून, बांधकामेही केल्याचे वृत्त 23 सप्टेंबर रोजी आले होते. अर्थात तेव्हाही या भागातील रहिवाशांनी चिनी हस्तक्षेपाविरुद्ध आक्रोश व्यक्त केला होता; पण आता विरोधी पक्षनेते जीवन बहादूर शाही यांनी हे प्रकरण उचलले आहे.
पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांच्या सरकारने ड्रॅगनला डोक्यावर बसवले आहे, असा घणाघात शाही यांनी केला आहे. चीनने नेपाळच्या या भागात नेपाळी लोकांच्याच येण्या-जाण्यावर बंदी घातली आहे. खाद्यपदार्थांनी भरलेले ट्रकही चिन्यांकडून रोखले जात आहेत. स्थानिक रहिवासी तसेच व्यापार्यांना माल वाहतूकदारांना त्यामुळे अडचणींचा सामना करावा लागत आहे, असे शाही यांनी सरकारच्या निदर्शनाला आणून दिले.
सरकारचे धोरण चीनवादी!
शाही करनाली प्रांतातून निवडून आलेले आहेत. ते स्वत: हुमला जिल्ह्यातील रहिवासी आहेत. शाही यांनी स्वत: घटनास्थळाची पाहणी केली. हुमला आणि सीमेला लागून असलेल्या काही भागांवरील चीनच्या अवैध ताब्याची पुष्टी प्रशासनाने केली आहे; पण विद्यमान सरकारच्या चीनवादी धोरणांमुळे ओलींच्या घशाला कोरड पडली आहे. त्यांचा आवाजच निघत नाही, अशी टीकाही शाही यांनी केली आहे. ओली यांच्यासह सरकारमधील मंत्र्यांचे म्हणणे आहे की, सीमेला लागून असलेल्या भागांत काहीही चुकीचे घडलेले नाही. पण वस्तुस्थिती ही आहे की, नेपाळच्या या जमिनीवर आपला दावा मजबूत करण्यासाठी सीमा दर्शविणारे जुने खांब उखडून चीनने आपल्या हिशेबाने नवे खांब बसविले आहेत. ओली सरकारही हे खांब योग्यच आहेत, असे म्हणत आहे.
सरकार म्हणते, आपलेच लोक खोटारडे
काही दिवसांपूर्वीच चिनी सैनिकांनी जाब विचारण्यास आलेल्या नेपाळी नागरिकांवर अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्याचे समोर आले होते. ही घटना तेव्हा घडली होती जेव्हा चिनी अतिक्रमणाला नेपाळ सरकारने नकार दिला होता. नुकतीच जी इमारत चीनकडून या भागात बांधण्यात आलेली आहे, ती नेपाळच्या हद्दीत नाही, असेही नेपाळ सरकारने म्हटले होते आणि आपल्याच देशवासीयांना खोटे पाडले होते. हुमलाचे लोक खोटे बोलत आहेत, असे ओली सरकारने म्हटले होते.
Post a Comment