माय अहमदनगर वेब टीम
मुंबई - भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रवेशाला शरद पवार यांनी हिरवा कंदील दाखवल्यानंतर वेगवान हालचाली होताना दिसत आहेत. एकनाथ खडसे यांनी जयंत पाटील यांचं ट्विट रिट्विट करत राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रवेशाचे सूचक संकेत दिले आहेत. महत्त्वाचं म्हणजे या ट्विटमध्ये जयंत पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केलेली आहे. यामुळे पुन्हा एकदा खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाची चर्चा रंगली आहे.
नरेंद्र मोदींनी मंगळवारी देशवासियांना संबोधून भाषण केलं. त्यांच्या या भाषणावर टीका करणारं ट्विट जयंत पाटील यांनी केलं होतं. त्यांनी म्हटलं होतं की, “आजच्या भाषणात पंतप्रधान काहीतरी नवीन सांगतील, करोना व आर्थिक संकटावर मात करण्यासाठी मार्ग देतील, अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दिलासा देतील असं वाटलं होतं. मात्र यापैकी त्यांनी काहीच केले नाही. महाराष्ट्राचा, देशाचा भ्रमनिरास केला”.
खडसे यांना राष्ट्रवादीचा हिरवा कंदील
“विरोधी पक्षातील प्रभावी व्यक्ती म्हणून एकनाथ खडसे यांचे नाव पुढे येते. एक पक्ष वाढविण्यासाठी त्यांनी केलेले कष्ट, मेहनत आणि जिद्द लक्षात घेतल्यानंतर आपली नोंद घेतली जात नाही, असे वाटत असेल आणि त्यातून एका विचाराकडे माणूस जातो. जेथे नोंद घेतली जाते तेथे जावे का, असे वाटत असेल आणि एखाद्या पक्षाविषयी तसे वाटत असेल तर चांगलेच आहे,” असं म्हणत शरद पवार यांनी खडसे प्रवेशाला हिरवा कंदील दाखविला.
नाथाभाऊ कुठे जाणार नाहीत – चंद्रकांत पाटील
दरम्यान भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी बोलताना म्हटलं होतं की, “नाथाभाऊ कुठेही जाणार नाहीत. ते भाजपाचे ज्येष्ठ नेते आहेत, आमचे मार्गदर्शक आहेत. सगळ्यांचा हिरमोड होईल, भाजपाचं नुकसान होईल असं कोणतंही कृत्य ते करणार नाहीत. त्यांची नाराजी संपवण्याचा प्रयत्न सुरु आहे. नाराज होणं, पुन्हा सामान्य होणं ही एक प्रक्रिया असते. त्यांच्याशी बोलणं सुरु आहे, पुन्हा ते उत्साहाने सहभाही होतील”.
Post a Comment