ट्रम्प यांचं मोठं विधान ; चीनला भारी किंमत चुकवावी लागेल




 माय अहमदनगर वेब टीम

काही दिवसांपूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना करोनाची लागण झाली होती. परंतु रुग्णालयात केवळ तीन दिवस उपचार घेतल्यानंतर ट्रम्प व्हाईट हाऊसमध्ये परतले होते. व्हाईट हाऊसमध्येच ट्रम्प यांच्यावर पुढील उपचार सुरू आहेत. अशा परिस्थितीत बुधवारी डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हिडीओ संदेशाद्वारे देशाला संबोधित केलं. यावेळी त्यांनी चीनवर जोरदार हल्लाबोल केला. तसंच करोना विषाणूच्या प्रादुर्भावाबद्दल चीनला दोषी ठरवल. दरम्यान, चीननं जगासोबत जे काही केलं त्याची किंमत त्यांना चुकवावीच लागेल, असं मोठं वक्तव्य ट्रम्प यांनी केलं.

सध्या करोना विषाणूनं जगभरात थैमान घातलं आहे. अमेरिका, भारत, ब्राझील या देशांना करोनाचा मोठा फटका बसला आहे. अशातच काही दिवसांपूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना करोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली होती. रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर काही दिवसातच ते व्हाईट हाऊसमध्ये परतले आणि त्यांनी आपल्या कामालाही सुरूवात केली. दरम्यान त्यांनी बुधवारी राष्ट्राल व्हिडीओ संदेशाद्वारे संबोधित केलं. यावेळी त्यांनी चीनवर जोरदार हल्लाबोल केला. “मला जी सुविधा मिळाली ती मी सर्वसामान्य लोकांसाठी उपलब्ध करायची आहे. तुम्हाला त्याच्यासाठी कोणतेही पैसे खर्च करण्याची आवश्यकता नाही. जे झालंय त्यात तुमची चूक नाही. ही चीनची चूक आहे. आपला देश आणि जगासोबत चीननं जे काही केलं त्याची मोठी किंमत त्यांना चुकवावी लागेल,” असं ट्रम्प म्हणाले.


डोनाल़्ड ट्रम्प व्हाईट हाऊसमध्ये परतल्यानंतर बुधवारी त्यांनी पहिल्यांदा व्हिडीओ संदेश जारी केला. या संदेशात त्यांनी ज्या प्रकारे त्यांना उपचार दिले गेले, तसेच उपचार अमेरिकेतील नागरिकांना देण्यात येतील असं आश्वासनही दिलं. पुढील महिन्यात अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकादेखील पार पडणार आहेत. अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना करोनाची लागण झाल्यानंतर ते रुग्णालयातून व्हाइट हाऊसमध्ये परत आले असले तरी त्यांच्या अध्यक्षीय निवडणुकीतील प्रचाराला लगाम बसण्याची चिन्हे आहेत. कोविडग्रस्त अध्यक्ष ट्रम्प जाहीर प्रचारात कसे सहभागी होणार यावर प्रश्नचिन्ह असून आता चार आठवडय़ांच्या शेवटच्या टप्प्यासाठी त्यांच्या प्रचाराचे सुधारित नियोजन केलं जात आहे. २०२० मधील निवडणूक संथपणे पुढे जात असतानाच अचानक ट्रम्प यांना करोनाची लागण शेवटच्या टप्प्यात झाली. त्यामुळे त्यांना ७२ तास रुग्णालयात काढावे लागले. दरम्यान, अध्यक्ष ट्रम्प यांनी त्यांच्या प्रतिनिधींमार्फत सुरू असलेली करोना पॅकेजच्या संदर्भात डेमोक्रॅटिक सदस्यांशी चर्चा अर्धवट सोडून आणखी गोंधळ निर्माण केला आहे. त्यामुळे अमेरिकेतील शेअर बाजार कोसळला. या सगळ्या प्रकारास सभागृहाच्या अध्यक्ष नॅन्सी पेलोसी जबाबदार आहेत, असा उलट आरोप ट्रम्प यांनी केला आहे.

बेदरकार वागणं सुरूच!

ट्रम्प हे व्हाइट हाऊसमध्ये परतले असून, त्यांचे बेदरकार वागणं पुन्हा सुरू झालं आहे. त्यांनी मास्क वापरणं बंद केलं आहे. आपल्याला लवकरात लवकर प्रचारात सहभागी व्हायचं असून त्यात बायडेन यांच्यासमवेत पुढील आठवड्यातील वादविवाद चर्चेतही सहभागी व्हायचं आहे, असा हट्ट त्यांनी धरला आहे. त्यामुळे ट्रम्प यांची इच्छा व वैद्यकीय पातळीवर त्यांच्याबाबत घेण्याची दक्षता या कात्रीत त्यांचे सल्लागार अडकले आहेत.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post