ठाकरे सरकारचा मोठा निर्णय ; मेट्रो कारशेड आरेऐवजी कांजूरमार्गमध्ये होणार



माय अहमदनगर वेब टीम
मुंबईः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मोठी घोषणा केली आहे. आरे कॉलनीत होणाऱ्या मेट्रो कारशेडला स्थगिती दिल्यानंतर ठाकरे सरकारनं आता मेट्रोचं कारशेड थेड कांजूरमार्ग येथे हलवण्यात आलं आहे. शासकिय जमीनीवर हे कारशेड होणार असून त्यासाठी शून्य खर्च येणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे. 

गतवर्षी आरे कॉलनीमध्ये मेट्रो कारशेडसाठी होणाऱ्या वृक्षतोडीला विरोध करण्यासाठी पर्यावरणप्रेमींनी आंदोलन छेडले होते. या आंदोलनात आदित्य ठाकरे यांनी पर्यावरणप्रेमींची बाजू उचलून धरल्यानं हा प्रश्न प्रतिष्ठेचा बनला होता. सत्तेत येताच ठाकरे सरकारनं आरे कॉलनीतील मेट्रो कारशेडच्या कामाला स्थिगिती दिली होती. त्यानंतर, आज ठाकरे सरकारनं आरेतील कारशेड रद्द करत कांजूरमार्ग येथे होणार असल्याची मोठी घोषणा केली आहे. 


मुंबईसाठी मोठा निर्णय सांगून मुख्यमंत्र्यांनी त्याच्या फेसबुक लाइव्हची सुरुवात केली. 'आरे कारशेडला माझा विरोध होता. तशी भूमिकादेखील मांडली होती. त्यामुळं आरेतील जंगलासाठी आंदोलन करणाऱ्या पर्यावरणवाद्यांवरील गुन्हे मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आरेतील ६०० एकर जमीन जंगल म्हणून घोषित केली आहे. त्याचबरोबर या जंगलाची व्याप्ती ८०० एकर झाली आहे. त्याचबरोबर आरेतील कारशेड दुसरीकडे स्थलांतरित करण्याचा निर्णय घेतला आहे. आरेतील कारशेड आता कांजूरमार्ग येथे करण्यात येणार आहे.'अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

'आरेतील झाडे कापून तयार करण्यात आलेले मेट्रो कारशेडचे काम थांबवले आहे. आता मेट्रोची कारशेड कांजूरमार्ग येथे उभारण्यात येईल. मात्र, यामुळं आरेतील कारशेडसाठी आत्तापर्यंत खर्च झालेला पैसा फुकट जाऊ देणार का? असा प्रश्न विचारण्यात येत आहे. परंतु, राज्य सरकार जनतेचा एकही पैसा फुकट जाऊ देणार नाही. आरेत मेट्रोच्या कारशेडसाठी उभारण्यात आलेली इमारत अन्य कामांसाठी वापरली जाईल. त्यामुळं तोही पैसा वाया जाऊ देणार नाही,' अशी माहिती उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post