माय अहमदनगर वेब टीम
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या संपत्तीचे ताजे विवरण पंतप्रधान कार्यालयाकडून जाहीर करण्यात आले असून ३० जून २०२० रोजी संपलेल्या वर्षात मोदी यांची संपत्ती ३६ लाख रुपयांनी वाढून २ कोटी ८५ लाख रुपयांवर गेली आहे. तर दुसरीकडे गृहमंत्री अमित शहा यांच्या संपत्तीत किरकोळ घट झाली आहे.
पंतप्रधान मोदी यांची संपत्ती २.४९ कोटी रुपयांच्या तुलनेत २.८५ कोटी रुपये इतकी झाली आहे. पंतप्रधानांच्या बँक खात्यातील ठेवी ३.३ लाख रुपयांनी वाढल्या असून सुरक्षित गुंतवणुकीवरील परतावा ३३ लाख रुपयांचा आहे.
३० जून २०२० रोजीच्या आकडेवारीनुसार पंतप्रधानांकडील रोख रक्कम ३१ हजार ४५० रुपये इतकी होती. त्यांचा बँक बॅलन्स ३ लाख ३८ हजार १७३ रुपये इतका होता. मोदी यांचे बँक खाते गुजरातमधील गांधीनगर येथील स्टेट बँकेत आहे.
मोदी यांचे वरील बॅंकेतीलच एफडी व एमओडी बॅलन्स १ कोटी ६० लाख २८ हजार ९३९ रुपयांचे आहे. याशिवाय मोदी यांच्याकडे ८ लाख ४३ हजार १२४ रुपयांची राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रे असून १ लाख ५० हजार ९५७ रुपयांची जीवनविमा पॉलिसी आहे. त्यांच्याकडे २० हजार रुपयांचे करमुक्त बॉण्ड आहेत. तर अचल संपत्तीची किंमत १.७५ कोटी रुपये इतकी आहे. पंतप्रधानांवर कसल्याही प्रकारचे कर्ज नाही. त्यांच्याकडे सोन्याच्या चार रिंगा आहेत. याची किंमत दीड लाख रुपये इतकी आहे. गांधीनगर येथील सेक्टर १ मध्ये ३५३१ चौरस फुटाचा एक प्लॉट मोदी यांच्या संयुक्तपणे नावावर आहे. या प्लॉटचे चारजण मालक असून मोदी यांची हिस्सेदारी २५ टक्क्यांची आहे.
Post a Comment