माय अहमदनगर वेब टीम
मुंबई - एकनाथ खडसे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात शुक्रवारी प्रवेश करणार असल्याच्या पार्श्वभूमीवर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका मंत्र्याला राजीनामा द्यायला लावला जाणार असल्याच्या बातम्याही चर्चिल्या जात आहेत. राष्ट्रवादीने आपल्याकडील मंत्रीपदाच्या सगळ्या जागा भरल्या आहेत.
खडसेंसारख्या जनाधार असलेल्या उत्तर महाराष्ट्रातील ओबीसी नेत्याला मंत्री केले जाणार यात शंका नाही. खडसेंना मंत्री करण्याकरिता गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड किंवा कामगार मंत्री दिलीप वळसे यांचा राजीनामा घेतला जाणार असल्याची चर्चा होती. वळसे यांना तब्येतीमुळे फारसे सक्रीय राहता येत नसल्याची कुजबूज त्यांचे पक्षांतर्गत विरोधक करत असतात. तर दुसरीकडे जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात ठाण्यातील करमुसे या इंजिनीअरने केलेली अपहरण व मारहाणीचे प्रकरण उच्च न्यायालयात प्रलंबित आहे. या प्रकरणात न्यायालयाने आव्हाड यांच्यावर ताशेरे वगैरे मारल्यास ते राजकीयदृष्ट्या अधिक अडचणीचे ठरू शकते, असे राष्ट्रवादीत बोलले जात आहे.
सध्या आव्हाड हे पवार यांच्या निकटवर्तीयांपैकी मानले जात असल्याने त्यांना पक्षाचे प्रदेशाध्यक्षपद देण्यात येऊ शकते आणि त्यांचा राजीनामा घेतला जाऊ शकतो, अशीही चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे खडसे पक्षात आल्याने राष्ट्रवादीतील कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण असले तरी पक्षातील मंत्र्यांचे चेहरे मात्र चिंताग्रस्त दिसू लागले आहेत.
Post a Comment