माय अहमदनगर वेब टीम
नगर: ‘ कर्जत जामखेड मधील मतदारांनी पवार कुटुंबीयांवर विश्वास ठेवून आमदार रोहित पवार यांना निवडून दिले. मात्र, आतापर्यंतच्या काळात त्यांनी उल्लेख करावा असे एकही भरीव काम केले नाही. उलट बारामती भागातील आपल्या कंपन्या व संस्थांच्या वस्तू येथे आणून विकण्याचा व्यापारच वाढविला,’ असा आरोप भाजप नेते व माजी माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांनी केला.
विधानसभा निवडणुकीला एक वर्ष झालं. गेल्या निवडणुकीतील पराभव शिंदे यांच्या फार जिव्हारी लागला होता. या पराभवाची सल त्यांनी अनेक माध्यमांतून व्यक्तही केली. आज या निकालाला एक वर्ष पूर्ण होत असताना प्रा. शिंदे यांनी कर्जतमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांना लक्ष्य केले. गेल्या वर्षभरात आमदार म्हणून पवार यांची कारकीर्द कशी राहिली, याचा लेखाजोखा मतदारांनी घेतला पाहिजे असे सांगून शिंदे म्हणाले की, ‘गेल्या वर्षभरात या मतदारसंघातील मतदारांनी आपले सर्वस्व गमावले आहे. नवीन काहीही कामे या भागात झाली नाहीत. आपल्या काळात मंजूर झालेल्या कामांतही खोडा घालण्याचे काम पवार यांनी केले. त्यामुळे हा भाग विकासापासून मागे खेचला गेला'.
'व्यापारी म्हणून आले आणि राज्यकर्ते झाले, असेच पवार यांच्या बाबतीत म्हटले पाहिजे. येथे सत्ता मिळाल्यानंतर त्यांनी बारामती भागातील कंपन्या आणि संस्थांचा विविध प्रकारचा माल येथे आणून विकण्यास सुरुवात केली आहे. कोंबड्यांची पिल्ले, पिठाच्या गिरण्या, स्वत: च्या नावाचे मास्क, झाडांची रोपे, माशांची बिजे अशा अनेक वस्तू येथे आणून विकल्या जात आहेत. एकवेळ हे करण्यास हरकत नाही. मात्र, लोकप्रतिनिधी म्हणून जनतेची कामे करण्याचेही कर्तव्य असते, हे लक्षात ठेवले पाहिजे. उलट लोकांना अपमानीत व्हावे लागत आहे. विकासापासून दूर रहावे लागत आहे. निवडणुकीत जाहीर केलेले बारामती पॅटर्न आणि नवे पर्व कोठेच दिसत नाही. पवार कुटुंबीयांना पन्नास वर्षांच्या कामाचा वारसा असल्याचे सांगतात, पण येथे तो दिसून येत नाही. त्यामुळे वर्षपूर्तीच्यावेळी आपण काय कमावले, काय गमावले याचा येथील मतदारांनी विचार केला पाहिजे', असे आवाहन शिंदे यांनी केले.
Post a Comment