'गब्बर'चा दुबईत धमाका; केली विक्रमांची बरसात!

 


माय अहमदनगर वेब टीम

दुबई - दिल्लीचा सलामीवीर शिखर धवनने आज (दि.२० ) किंग्ज इलेव्हन पंजाब विरुद्धच्या सामन्यात तुफान फटकेबाजी केली. त्याने सलामीला येत आक्रमक अर्धशतक झळकावले. हे त्याचे आयपीएलमधील ४० वे अर्धशतक ठरले. याचबरोबर त्याने आज अजून एक माईलस्टोन पार केला. 

या शतकी खेळीदरम्यान दिल्लीच्या सलामीवीरने आयपीएलमधील ५ हजार धावांचा टप्पा पार केला. तसेच सलग चार डावांमध्ये ५० पेक्षा जास्त धावा करण्याचा विक्रम केला. धवनने डावाच्या १३ व्या षटकात रवी बिश्नोईवर षटकार ठोकला आणि स्पर्धेत ५ हजार धावांचा टप्पा गाठणारा पाचवा फलंदाज ठरला. १६९ व्या सामन्यात त्याने ही कामगिरी केली.

आयपीएलमध्ये ५ हजार धावा पूर्ण करणारा शिखर धवन पाचवा फलंदाज ठरला. त्याने विराट कोहली, सुरेश रैना, रोहित शर्मा आणि डेव्हिड वॉर्नर यांच्या क्लबमध्ये ग्रँड एन्ट्री केली आहे. शिखरने आयपीएलमध्ये आपल्या ५ हजार धावा एका चांगल्या दिवशी पूर्ण केल्या आहेत. शिखरने आजच्याच दिवशी २०१० ला एकदिवसीय सामन्यात भारताकडून पदार्पण केले होते. त्याला टीम इंडियात सामील होऊन १० वर्षे पूर्ण झाली आहेत. 

आयपीएलमध्ये ५ हजार धावा करण्यात अव्वल आहे तो आरसीबीचा कर्णधार विराट  कोहली. त्याने आयपीएलमध्ये आतापर्यंत ५ हजार ७५९ धावा केल्या आहेत. तर सुरेश रैनाने ५ हजार ३६८ धावा केल्या आहेत. याच्या पाठोपाठ तिसऱ्या क्रमांकावर आहे तो रोहित शर्मा. त्याने ५ हजार १५८ धावा केल्या आहेत. या यादीत फक्त एकाच विदेशी खेळाडूचे नाव आहे. तो आहे डेव्हिड वॉर्नर त्याने ५ हजार ३७ धावा केल्या आहेत. विशेष म्हणजे त्याने आयपीएलमध्ये सर्वात जलद ५ हजार धावा करण्याचा मान पटकावला आहे. त्याने १३५ डावात ही कामगिरी केली. त्याने विराटला  (१५७ ) या स्पर्धेत मागे टाकले. पाच हजारी मनसबदारीत आता शिखर धवनही सामील झाला आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post