माय अहमदनगर वेब टीम
मिरज - कोरोनामुळे तब्बल सात महिने लॉकडाऊन असलेली कोल्हापूर - गोंदिया महाराष्ट्र एक्सप्रेस रविवारी जिल्ह्यातील तीनशे-चारशे प्रवासी घेऊन ही रेल्वेगाडी प्रथमच गोंदियाकडे रवाना झाली.
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याचे पाहून देशात अनलॉक करण्यात येत आहे. रेल्वे मंत्रालयाकडून देशभरात टप्प्याटप्प्याने रेल्वे वाहतूक सुरू करण्यात येत आहे. यामध्ये कोल्हापूर येथून व मिरज मार्गे धावणाऱ्या कोल्हापूर -गोंदिया महाराष्ट्र एक्सप्रेस आणि कोल्हापूर - मुंबई कोयना एक्सप्रेस या गाड्यांचा समावेश करण्यात आला आहे.
रविवारी कोल्हापूर - गोंदिया महाराष्ट्र एक्सप्रेस गोंदियाकडे रवाना झाली. जिल्ह्यातील सुमारे तीनशे ते चारशे प्रवासी घेऊन एक्सप्रेस लॉकडाऊन नंतर प्रथमच धावली.
तसेच सोमवारपासून कोयना एक्सप्रेस देखील नियमितपणे सुरू होत आहे. लॉकडाऊन पूर्वी मिरज मार्गे 60 ते 65 एक्सप्रेस व पॅसेंजर रेल्वे गाड्या धावत होत्या. परंतु सध्या गोव्यातील मडगाव येथून सुटणारी निजामुद्दीन गोवा एक्सप्रेस, यशवंतपुर- निजामुद्दीन एक्सप्रेस, यशवंतपुर- निजामुद्दीन क्लोन एक्सप्रेस या तीन गाड्या सुरू आहेत. टप्प्याटप्प्याने मिरज मार्गे धावणाऱ्या रेल्वे गाडीच्या संख्येत वाढ करण्यात येत आहे. नजीकच्या काळात कोल्हापूर -मुंबई महालक्ष्मी व सह्याद्री एक्सप्रेस देखील सुरू होण्याची शक्यता आहे.
रेल्वे स्थानक पुन्हा हळूहळू पूर्वपदावर..
गेल्या काही दिवसांपासून रेल्वे मंत्रालयाकडून लांब पल्ल्याच्या रेल्वे सुरू करण्यात येत आहेत. त्यामुळे आता रेल्वे स्थानकांमध्ये प्रवाशांची गर्दी वाढू लागली आहे. यापूर्वी रेल्वेकडून मालवाहतूक व शेतीमालाची वाहतूक करण्यात येत होती. या वाहतुकीला देखील शेतकऱ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळाला होता. आता प्रवासी वाहतूक हळूहळू पूर्वपदावर येत आहे. त्यामुळे रेल्वेस्थानक पुन्हा फुलू लागले आहे.
Post a Comment