: इंदुरीकर फडणवीसांच्या कानात काय बोलले?; तर्कवितर्कांना उधाण

 


माय अहमदनगर वेब टीम

अहमदनगर - कीर्तनाच्या व्यासपीठावरून राजकारणावर तुफान फटकेबाजी करून राजकारण्यांना खडेबोल सुनावणारे प्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराज हे आज थेट व्यासपीठावर जाऊन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना जाऊन भेटताना दिसले. यावेळी त्यांनी फडणवीस, पाटील यांच्याशी काही मिनिटे संवादही साधला. यानिमित्ताने मात्र इंदुरीकर महाराज हे फडणवीस व पाटील यांना काय बोलले असतील?, याची चर्चा सुरू झाली असून त्यावरून विविध तर्कवितर्क लावण्यात येत आहेत. 

विधानसभा निवडणुकीपूर्वी म्हणजेच २०१९ मध्ये राज्यात तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाजनादेश यात्रा काढली होती. ही यात्रा संगमनेर येथे आल्यानंतर फडणवीस यांच्या व्यासपीठावर इंदुरीकर महाराज दिसले होते. त्यानंतर इंदुरीकर महाराज हे भाजपमध्ये प्रवेश करून विधानसभा निवडणूक लढवणार असल्याची चर्चाही राजकीय वर्तुळात सुरू झाली होती. मात्र, मी राजकारणात प्रवेश करणार नसून कोणत्याही राजकीय पक्षात जाणार नाही. त्यामुळे निवडणूक लढवण्याचा प्रश्नच येत नाही, असा खुलासा त्यावेळी इंदुरीकर महाराजांनी देत सुरू झालेल्या चर्चांना पूर्णविराम दिला होता. त्यातच आज पुन्हा एकदा इंदुरीकर महाराजांनी थेट व्यासपीठावर जात फडणवीस व पाटील यांची भेट घेतल्याने नव्याने चर्चांना तोंड फुटले आहे.

लोकनेते पद्मभूषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील यांनी शब्दबद्ध केलेल्या ‘देह वेचावा कारणी’ या आत्मचरित्र प्रकाशनाचा मुख्य कार्यक्रम प्रवरानगर येथील डॉ. धनंजय गाडगीळ सभागृहात आज झाला. या कार्यक्रमाला राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार सदाशिव लोखंडे, हर्षवर्धन पाटील, हरिभाऊ बागडे, शिवाजी कर्डिले, पोपट पवार, राजेंद्र विखे यांच्यासह आजी-माजी खासदार, आमदार, पदाधिकारी उपस्थित होते. हा कार्यक्रम संपल्यानंतर इंदुरीकर महाराज यांनी थेट व्यासपीठावर जात देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, रावसाहेब दानवे यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस व चंद्रकांत पाटील यांच्यासोबत काही मिनिटे संवाद सुद्धा साधला. व्यासपीठावर महाराजांनी अचानक केलेल्या या एन्ट्रीमुळे मात्र आता पुन्हा राजकीय चर्चेला उधाण आले आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post