आज मोठी राजकीय घडामोड, एकनाथ खडसे करणार राष्ट्रवादीत प्रवेश

 


माय अहमदनगर वेब टीम

मुंबई - राज्याच्या राजकारणातील मोठी घडामोड आज घडणार आहे. गेल्या ४० वर्षांपासून भाजपामध्ये असणारे एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. बुधवारी जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेत एकनाथ खडसे पक्षात प्रवेश करणार असल्याचं जाहीर केलं होतं. त्यानुसार आज दुपारी २ वाजता एकनाथ खडसेंचा पक्षप्रवेश पार पडणार आहे. एकनाथ खडसे यांनी आपल्यासोबत एकही आमदार, खासदार राष्ट्रवादीत येणार नसल्याचं आधीच स्पष्ट केलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रवेशासाठी एकनाथ खडसे गुरुवारीच हेलिकॉप्टरने मुंबईत दाखल झाले. त्यांच्यासोबत त्यांची मुलगी रोहिणी खडसे यादेखील आहेत. रोहिणी खडसे यांनीही आपण भाजपामधून बाहेर पडणार असल्याचं जाहीर केलं असून राष्ट्रवादीसाठी काम करणार असल्याचं सांगितलं आहे. एकनाथ खडसेंसोबत जळगाव, धुळे, नंदुरबार या जिल्ह्य़ांतील त्यांचे समर्थकही पक्षात प्रवेश करणार आहेत, असं जयंत पाटील यांनी सांगितलं आहे. तसंच खडसे यांच्या पुनर्वसनाबाबत कोणी चिंता करू नये, असंही ते म्हणाले आहेत.

भाजपामधून बाहेर पडल्यावर खडसे काय म्हणाले होते –

“कोणीही माझ्या राजीनाम्याची, चौकशीची मागणी केली नसताना राजीनामा घेतला गेला. सभागृहात कोणी अशी मागणी केल्याचं सिद्ध केलं तर मी राजकारण सोडण्यास तयार आहे. मीदेखील पक्षासाठी उभं आयुष्य घालवलं. दगड, धोंडे खाल्ले, लोकांनी मारलं, थुंकलं, वाळीत टाकलं अशा कालखंडातही आम्ही काम केलं. पक्षाने कमी दिलं असं नाही. पण मीदेखील पक्षासाठी ४० वर्ष काम केलं. आजही माझी कोणाविरोधातही तक्रार नाही. माझी तक्रार वारंवार बोलून दाखवली आहे,” असं एकनाथ खडसे यांनी सांगितलं होतं.

पुढे ते म्हणाले होते की, “देवेंद्र यांनी ज्याप्रक्रारे विनयभंगाचा खटला दाखल केला, भूखंड प्रकरणी चौकशी लावली… त्या सर्वांमधून मी सुटलो, पण मनस्ताप किती झाला. विनयभंगाचा खटला दाखल कऱणं, कोर्टात ते चालणं यापेक्षा मरण परवडलं. मी जेव्हा खटला दाखल कऱण्यासंबंधी देवेंद्रजींना विचारलं तेव्हा ते म्हणाले ती महिला फार गोंधळ घालत होती, टीव्हीवर दाखवलं जात होतं म्हणून नाईलाजाने सांगितलं. नियमानुसार काम करा असं सांगता आलं असतं. मला बदनामी सहन करावी लागली. इतक्या खालच्या स्तरावरुन जाऊन राजकारण झालं”.

“मी फक्त देवेंद्र फडणवीस यांच्यावर नाराज आहे. एकाप्रकारे विनयभंगाचा खटला दाखल करणं तोही बनावट यापेक्षा वाईट काय. त्यांच्यासाठी मुख्यमंत्र्यांनी फोन करणं त्यापेक्षा वाईट,” असं खडसेंनी म्हटलं. “भ्रष्टाचाराचा आरोप वैगेरे ठीक आहे, पण विनयभंगाचा आरोप किती वाईट, मी सुटलो त्यातून नाहीतर तीन महिने जेलमध्ये गेलो असतो. बदनामी घेऊन गेलो असतो,” अशी खंत खडसेंनी व्यक्त केली.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post