खडसे सिर्फ झांकी है!; राष्ट्रवादीच्या या मंत्र्याने दिले आणखी भूकंपाचे संकेत

 


माय अहमदनगर वेब टीम

कोल्हापूर: भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे राष्ट्रवादी  काँग्रेस पक्षात स्वागत आहे, असे नमूद करत राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी आपल्या खास शैलीत या राजकीय घडामोडीवर भाष्य केले आहे.

एकनाथ खडसे यांनी भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. ते शुक्रवारी मुंबईत राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयात पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थित राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. याबाबत अधिकृत घोषणा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केल्यानंतर अनेक प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. एकीकडे भाजपमधून खडसेंचा निर्णय 'धक्कादायक', 'दुर्दैवी', 'चुकीचा' अशा प्रतिक्रिया येत असताना महाविकास आघाडीतील तीनही पक्षांनी खडसेंचे स्वागत केले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खडसेंचे स्वागत करताना भाजपला पाया ठिसूळ होतोय याचा विचार करण्याचा सल्ला दिला आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे सरकारमधील एक मंत्री हसन मुश्रीफ यांनीही अगदी नेमकी आणि भाजपला झोंबणारी प्रतिक्रिया दिली आहे.

'एकनाथ खडसे सिर्फ झांकी है, अभी बहुत कुछ बाकी है', असे नमूद करत मुश्रीफ यांनी टोलेबाजी केली. आगामी काळात भाजपमध्ये गेलेले तसेच काठावरचे अनेकजण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येतील, असा दावा मुश्रीफ यांनी केला. एकनाथ खडसेंचे पक्षात आनंदाने स्वागत करतो, त्यांच्यामुळे खान्देशात पक्षाची ताकद वाढेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

भाजपचे नुकसान होईल, पण...

माजी मंत्री एकनाथ खडसेंचा भाजप सोडण्याचा निर्णय निश्चितच दुर्दैवी आहे. त्यामुळे पक्षाला नुकसान तर होणार आहेच; पण ते क्षणिक आहे. शेवटी पक्ष हा विचारांवर आणि तत्वांवर चालतो, अशी प्रतिक्रिया जळगाव जिल्ह्यात भाजपचे दुसरे मोठे नेते आमदार गिरीश महाजन यांनी दिली आहे. एकनाथ खडसे यांचे भाजप वाढीसाठी मोठे योगदान राहिले आहे. त्यांनी आणि मी सोबत काम केले आहे. प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी भाजपसाठी काम केले होते. त्यांच्या कार्याला तोड नाही. त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे. परंतु, त्यांनी घेतलेला भाजप सोडण्याचा निर्णय दुर्दैवी आहे. या निर्णयामुळे भाजपला निश्चितच नुकसान सहन करावे लागेल. पण ते नुकसान क्षणिक असणार आहे, असे महाजन पुढे म्हणाले. भाजप हा काँग्रेस, शिवसेनेप्रमाणे घराणेशाहीवर चालणारा पक्ष नाही की ज्या ठिकाणी गांधी गेले, बाळासाहेब ठाकरे गेले, आता पुढे काय? असा प्रश्न उद्धवतो. भाजप खऱ्या अर्थाने कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. याठिकाणी अनेकजण पक्षात आले, मोठे झाले आणि गेलेही. परंतु, पक्ष वाढतच राहिला. या पक्षात चहा विकणारा सर्वसामान्य माणूस देखील देशाच्या पंतप्रधानपदी जाऊ शकतो, ही भाजपची ताकद आहे, असेही महाजन यांनी नमूद केले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post