दरेकरांनी खडसेंचे पाय धरायला हवे होते; 'या' मंत्र्याने केला पलटवार



 माय अहमदनगर वेब टीम

अहमदनगर - ‘एकनाथ खडसे यांचा गेम करून देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधण्यासाठी राष्ट्रवादीने त्यांना पक्षात घेतले आहे,' अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी सातारा येथे बोलताना केली होती. या टीकेला ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी प्रत्युत्तर देताना, ‘हे म्हणजे चहा पेक्षा किटली गरम झाली आहे,’ असा टोला लगावला. 

‘देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल खडसे यांची जी तक्रार आहे, जी खदखद आहे, ती आजची नसून चार वर्षाची आहे. त्यामुळे तुम्ही चार वर्ष का गप्प बसलात? त्यांची का मनधरणी केली नाही? असा सवाल उपस्थित करतानाच, खडसे जावेत असेच त्यांना वाटत असल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले. नगर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी करून मुश्रीफ यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांना दरेकर यांनी सातारा येथे केलेल्या वक्तव्याबाबत विचारले असता ते म्हणाले, ‘हे म्हणजे आता चहापेक्षा किटली गरम झाली आहे. फडणवीस यांच्याबद्दल खडसे हे चार वर्षापासून बोलत आहेत. ते काही आता पहिल्यांदा बोलत नाहीत. चार वर्षात दरेकर यांनी खडसे यांची मनधरणी करून त्यांचे गैरसमज दूर केले पाहिजे होते. प्रवीण दरेकर यांना कोणी रोखले नव्हते. त्यांनी जाऊन खडसे यांच्या पाया पडले पाहिजे होते, कारण खडसे सीनिअर आहेत. दरेकर हे तर आता भाजप मध्ये जाऊन विरोधी पक्षनेते झाले आहेत. त्यामुळे त्यांनी सीनिअर माणसाला रोखण्याची आवश्यकता होती,’ असा टोलाही त्यांनी लगावला. 

‘खडसे यांची देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल जी तक्रार आहे, खदखद आहे, ती आजची नाही तर चार वर्षांची आहे. खडसे हे विधानसभा निवडणुकीच्या वेळी सुद्धा सांगत होते, माझे काय चुकले, हे तुम्ही येऊन बोला. त्यामुळे तुम्ही चार वर्ष का गप्प बसलात ? त्यांची का मनधरणी केली नाही ? मला वाटते, खडसे जावेत असेच त्यांना वाटत असावे,’ असेही मुश्रीफ यांनी स्पष्ट केले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post