माय अहमदनगर वेब टीम
पुणे: दिवसभर विश्रांती घेतलेला पाऊस मंगळवारी रात्री धुवाँधार बरसला. रात्री दहा नंतर पुणे शहराच्या विविध भागात ढगांच्या गडगडाटासह आणि विजांच्या कडकडाटात जोरदार पाऊस पडला. त्यामुळे शहरात ठिकठिकाणी पाणी साठले होते. रात्रीच्या निरव शांततेत घराबाहेर कोसळणारा पाऊस, ढगांचा गडगडाट आणि विजांच्या चमकण्याने नागरिक धास्तावले. पावसाचा जोर पाहून अनेकांना गेल्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसाची रात्र आठवून धडकी भरली.
हडपसर, कोंढवा, कात्रज मध्ये पावलाला पहिल्यांदा सुरुवात झाली आणि अर्ध्या तासात शहराच्या सर्वच भागात जोराचा पाऊस पडला.
मुख्य रस्त्यांबरोबरच उपनगरातील गल्ल्यांमध्ये रस्त्याच्या कडेला पाणी साठले होते. रात्री उशिरापर्यंत सरी बरसत राहिल्या. परतीचा पाऊस, ऑक्टोबर हिटच्या प्रतीक्षेत असलेल्या पुणेकरांना ऑक्टोबरच्या पावसाने धडकी भरवली आहे. शहरालगतच्या घाट माथ्यावर आणि जिल्ह्यातही मुसळधार पावसाने हजेरी लावली. पुढील दोन दिवस शहरात मेघगर्जनेसह मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा तर घाट माथ्यावर जोरदार पाऊस पडणार असल्याचा इशारा भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिला आहे.
दरम्यान, पुण्यात गेल्या एका तासात ४३.२ मि.मी. पाऊस झाल्याची नोंद करण्यात आली आहे.
बळीराजा धास्तावला
कोल्हापूर: जिल्ह्यात दुसऱ्या दिवशीही पावसाची रिपरिप कायम राहिली आहे. यामुळे भात, सोयाबीनची कापणी व मळणी थांबल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. परतीच्या पावसाने आठ दिवस जिल्ह्याला झोडपून काढले. दोन दिवस विश्रांती घेतल्यानंतर पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढला आहे. मंगळवारी दिवसभर पावसाची रिपरिप कायम होती. भात, सोयाबीनला याचा मोठा फटका बसला आहे. शेतात असलेला भात, सोयाबीन कुजत असून मळणीसाठी काढलेल्या सोयाबीनला कोंब फुटत आहेत. आणखी काही दिवस पाऊस कायम राहिल्यास ही पिके पूर्णपणे हातातून जाणार असल्याने शेतकरी धास्तावला आहे.
Post a Comment