माय अहमदनगर वेब टीम
मुंबई - भाजपमध्ये एकाकी पडलेले पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे उद्या, शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत. राष्ट्रवादीकडून त्यांना राजकीय ताकद देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून त्यांचा राज्य मंत्रिमंडळात समावेश केला जाणार आहे. त्यांच्याकडे कृषी किंवा कामगार खात्याची जबाबदारी सोपविण्यात येणार असल्याचे समजते.
खडसे यांच्या पक्ष प्रवेशाची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. पुणे येथील जमीन घोटाळ्यात हात असल्याच्या आरोपामुळे खडसे यांना फडणवीस सरकारमधून बाहेर पडावे लागले होते. तेव्हापासून खडसे भाजपमध्ये एकाकी पडले आहेत. गेल्यावर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीतही त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली होती. त्यांच्याऐवजी त्यांच्या कन्येला भाजपने तिकीट दिले. मात्र, त्यांचाही पराभव झाला. आपल्या मुलीच्या विजयासाठी पक्षाने काहीच प्रयत्न केले नाहीत, असे खडसे यांचे म्हणणे आहे.
पक्षातील दुसर्या फळीतील नेते पंकजा मुंडे आणि विनोद तावडे यांना पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत घेऊन पक्षाने त्यांना खिजवले. त्यामुळे खडसे आता हमखास पक्षांतर करतील, अशी चर्चा होती. मात्र, खडसे यांनी आपले पत्ते ओपन केले नाहीत. अखेरीस त्यांनी बुधवारी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडे पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देऊन नवा राजकीय डाव मांडला.
शिवसेना-राष्ट्रवादीच्या खात्यांची अदलाबदल होणार?
खडसे यांना पक्षात घेतल्यास शिवसेनेची नाराजी ओढवेल, हे गृहीत धरून राष्ट्रवादीने गेल्या पंधरा दिवसांपासून सावकाश पावले टाकण्यास सुरुवात केली होती. पक्ष प्रवेशानंतर त्यांचा राज्य मंत्रिमंडळात समावेश होण्याचीही शक्यता वर्तविली जात आहे. सध्या शिवसेनेकडे कृषी खाते आहे. खडसे यांनी या खात्याचा आग्रह धरला असल्याचे समजते. जितेंद्र आव्हाड यांच्याकडील गृहनिर्माण खाते मिळाले, तर कृषी खाते सोडण्यास शिवसेना तयार असल्याची चर्चाही राजकीय वर्तुळात सुरू आहे. मात्र, नगरविकास खातेही शिवसेनेकडे असल्यामुळे शहरी भागावरील आपले वर्चस्व कमी होईल, या भावनेने राष्ट्रवादीने पक्षाचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे-पाटील यांच्याकडील कामगार खाते खडसे यांना देण्याबाबत विचार सुरू केला असल्याचेही खात्रीलायक वृत्त आहे.
Post a Comment