टक्कल पडण्याची आहे भीती? केसगळती रोखण्यासाठी या नैसर्गिक तेलांचा करा वापर



 माय अहमदनगर वेब टीम

हेेल्थ डेस्क - काळेशार आणि घनदाट केसांमुळे आपल्या सौंदर्यात भर पडते, असे म्हटलं जातं. पण हल्लीचे धकाधकीचे जीवन, ताणतणाव - चिंता, प्रदूषण इत्यादी कारणांमुळे अनेक जण केसांशी संबंधित समस्यांमुळे त्रस्त असल्याचे दिसत आहे. बहुतांश जण केसगळती, कोंडा, केस तुटणे इत्यादी समस्या दूर करण्यासाठी महागड्या ट्रीटमेंट्सची मदत घेतात. 

या केमिकलयुक्त उपचारांमुळे केसांचे प्रचंड नुकसान होते, ही बाब लक्षात घ्यावी. केसांची देखभाल करण्यासाठी तज्ज्ञांचा सल्ला घेऊन तुम्ही नैसर्गिक उपाय करू शकता. केस मजबूत राहण्यासाठी टाळूची त्वचा निरोगी असणं आवश्यक आहे. केस आणि टाळूची काळजी घेण्यासाठी तेल मसाज करावा. टक्कल पडू नये म्हणून केसांसाठी कोणते तेल वापरावे, जाणून घेऊया माहिती.

​मोहरीचे तेल

केसगळती रोखण्यासाठी आठवड्यातून कमीत कमी दोनदा मोहरीच्या शुद्ध तेलाने केसांचा मसाज करावा. मोहरीमध्ये झिंक, फॉलेट आणि सॅलेनियमची मात्रा भरपूर असते. हे घटक आपले केस मुळांसह मजबूत करण्याचे कार्य करतात. यामुळे केसगळती, केस तुटणे यासारख्या समस्या दूर होण्यस मदत मिळते. आठवड्यातून दोनदा मोहरीच्या तेलाने केसांचा मसाज केल्यास केसगळती नियंत्रणात येईल.

​ऑलिव्ह ऑइल

ऑलिव्ह ऑइलचा वापर केल्यास टक्कल पडण्याची समस्या निर्माण होणार नाही. या तेलामुळे केसगळती थांबण्याव्यतिरिक्त टाळूच्या त्वचेवरील रोमछिद्रे देखील स्वच्छ होतात. ऑलिव्ह ऑइसमुळे नवीन केस येण्यासही मदत मिळते. या तेलामध्ये ओलयुरोपिन (Oleuropein) तत्त्व असते. हे तत्त्व केसांची वाढ करण्यास आणि केस मुळांसह मजबूत करण्याचे कार्य करतात. ऑलिव्ह ऑइल आणि अंड्याचं हेअर पॅकही तुम्ही वापर करू शकता.

​द्राक्ष बियाणांचे तेल

आपल्याला हे तेल कोणत्याही किराणामालाच्या दुकानात सहज सापडेल. द्राक्षांच्या बियांपासून हे तेल तयार केलं जातं. या तेलामध्ये मोठ्या प्रमाणात औषधी गुणधर्मांचा साठा आहे. ज्यामुळे केस घनदाट होण्यास मदत मिळते. सोबतच यामध्ये व्हिटॅमिन ई भरपूर प्रमाणात असल्याने केसांची वाढ देखील होते.

​नारळाचे तेल

आपल्यापैकी बहुतांश जण केसांसाठी नारळाच्या तेलाचा वापर करतात. नारळाच्या तेलातील पौष्टिक तत्त्व आपले केस घनदाट आणि मजबूत करण्याचे कार्य करतात. योग्य प्रकारे या तेलाचा वापर केल्यास टक्कल पडण्याची समस्या उद्भवत नाही. पण भेसळयुक्त नारळ तेल वापरू नये. अशा प्रकारच्या तेलांमुळे केसांवर दुष्परिणाम होऊ शकतात.

​एरंडेल तेल

एरंडेल तेलाचा वापर फार पूर्वीपासून करण्यात येत आहे. या तेलामध्ये ओमेगा ९ फॅटी अ‍ॅसिड आहे. या फॅटी अ‍ॅसिडमुळे टाळूवरील सीबमचा नियंत्रणात स्त्राव होतो आणि केसगळती कमी प्रमाणात होते. आठवड्यातून दोनदा एरंडेल तेलाने केसांचा मसाज करावा.

​लव्हेंडर ऑइल

या तेलामध्ये अँटी सेप्टिक आणि अँटी मायक्रोबियल गुणधर्म आहेत. या गुणधर्मांमुळे कोंड्याची समस्या दूर होते. याव्यतिरिक्त यातील पोषण तत्त्व मुख्यतः एलोपेसिया नावाचा आजार समूळ नष्ट करण्याचे कार्य करतात. या आजारामुळे टक्कल पडते. ही समस्या टाळण्यासाठी तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार लव्हेंडर ऑइलचा वापर करावा.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post