ट्रम्प - जो बायडन यांच्यातील दुसरी व्हर्च्युअल अध्यक्षीय चर्चा रद्द

 

माय अहमदनगर वेब टीम

वॉशिंग्टन - अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीकडे सार्‍या जगाचे लक्ष लागले आहे. दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बायडन यांच्यात 15 ऑक्टोबरला होणारी दुसरी अध्यक्षीय चर्चा रद्द झाली आहे. दरम्यान, आता 22 ऑक्टोबरला टेनेसीच्या नॅशविल येथे होणार्‍या तिसर्‍या व शेवटच्या चर्चेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

निवडणुकीच्या आधी ही चर्चा एका तटस्थ आयोगामार्फत आयोजित करण्यात येते. 15 ऑक्टोबर रोजी होणारी ही चर्चा डोनाल्ड ट्रम्प यांना कोरोनाची लागण झाल्याने सुरक्षेच्या कारणास्तव व्हर्च्युअल पद्धतीने होणार होती. आयोगाच्या या निर्णयावर डोनाल्ड ट्रम्प यांनी नाराजी व्यक्‍त करून आपण या चर्चेत सामील होणार नसल्याचे याआधीच स्पष्ट केले होते, तर जो बायडन यांनी ट्रम्प यांच्यावर टीका करून सुरक्षेच्या कारणास्तव या चर्चेत भाग घ्यायला नकार दिला होता. बायडन त्या दिवशी अन्य एका कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.फॉक्स न्यूजला दिलेल्या एका मुलाखतीत डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, की त्यांची तब्बेत आता उत्तम आहे. त्यांनी दुसर्‍यांदा कोरोना टेस्ट करून घेतली आहे; पण त्याचा रिझल्ट सांगण्यास त्यांनी नकार दिला. त्यांनी हेही स्पष्ट केले, की त्यांनी आता औषधे घेण्याचे बंद केले आहे. निवडणुकीला काहीच दिवस राहिले असताना ट्रम्प यांना कोरोनाची लागण झाल्याने निवडणूक मोहिमेपासून लांब राहावे लागले. त्याचा त्यांच्या फंड गोळा करण्याच्या कार्यक्रमावरही परिणाम झाला होता. 

नुकत्याच एका सर्व्हेनुसार ट्रम्प हे त्यांचे स्पर्धक जो बायडन यांच्या तुलनेत मागे पडले आहेत. ट्रम्प सोमवारी फ्लोरिडात निवडणूक मोहिमेत भाग घेणार आहेत. जो बायडन यांनी ट्रम्प यांच्या सार्वजनिक कार्यक्रमात भाग घेण्याच्या निर्णयावर जोरदार टीका केली. ते म्हणाले, की ट्रम्प यांच्या प्रशासनाने कोरोना परिस्थिती अत्यंत असंवेदनशील पद्धतीने हाताळली. त्यांनी मास्कचा वापर आणि सोशल डिस्टन्सिंगबाबत निष्काळजीपणा केला. त्यांच्या अशा धोरणांमुळेच सर्वत्र संदिग्धता पसरली आहे. याआधी ट्रम्प यांनी डेमोक्रॅटिक पक्षाच्या उपाध्यक्ष पदाच्या उमेदवार कमला हॅरिस यांच्यावर जोरदार टीका करून त्यांना कम्युनिस्ट म्हटले होते.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post