गुडघेदुखीमुळे त्रस्त आहात का? जाणून घ्या घरगुती उपाय

 


माय अहमदनगर वेब टीम

हेल्थ डेस्क - वाढत्या वयोमानानुसार आपल्या शरीरामध्ये निरनिराळे बदल होत असतात. यामध्ये पाठदुखी, कंबरदुखी, गुडघेदुखी इत्यादी समस्यांचाही आपल्याला सामना करावा लागण्याची शक्यता असते. पण हल्ली तरुणवर्गामध्येही गुडघेदुखीचे प्रमाण वाढत आहे. शारीरिक वेदनांवर वेळीच उपाय करणं आवश्यक आहे. अन्यथा भविष्यात गंभीर समस्या उद्भवण्याची शक्यता असते. 

गुडघ्यांचे दुखणे कमी करण्यासाठी तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेऊन घरगुती उपाय देखील करू शकता. तसंच शरीर सक्रिय राहण्यासाठी नियमित व्यायाम आणि पौष्टिक आहाराचे सेवन करणं देखील आवश्यक आहे. कारण राहणीमान, खाण्यापिण्याच्या सवयींवरही आपले आरोग्य अवलंबून असते. यामुळे आपल्या जीवन शैलीमध्ये योग्य ते बदल करावेत. गुडघेदुखी कमी करण्यासाठी कोणत्या घरगुती उपचारांची मदत होऊ शकते, जाणून घेऊया सविस्तर माहिती 

​हळदीचे दूध

हळदीच्या दुधाचे नियमित सेवन केल्यास कित्येक आजार दूर ठेवण्यास तुम्हाला मदत मिळते. आयुर्वेदिक उपचारांमध्ये हळदीला भरपूर महत्त्व आहे. हळदीचे दूध प्यायल्यास तुम्हाला गुडघेदुखी आणि असह्य वेदनेपासून देखील आराम मिळेल. हळदीच्या दुधाला ‘गोल्डन मिल्क’ असेही म्हटलं जातं. या घरगुती उपायामुळे आपले शरीर देखील मजबूत राहण्यास मदत मिळते. शारीरिक थकवा, ताणतणाव सुद्धा कमी होतो.

​कोरफड जेल

कोरफड जेलचा ब्युटी केअर रुटीनमध्ये सर्वाधिक वापर केला जातो. या जेलमुळे त्वचा निरोगी आणि नितळ राहण्यास मदत मिळते. पण यातील पोषक तत्त्वे हाडे आणि स्नायूंसाठीही लाभदायक असतात. शारीरिक दुखणे कमी करण्यासाठी हा एक प्रभावी उपाय मानलो जातो. गुडघेदुखीचा त्रास उद्भवल्यास गुडघ्यांना कोरफड जेल लावून हलक्या हाताने मसाज करावा. या जेलमधील पोषण तत्त्व त्वचेच्या रोमछिद्रांद्वारे शरीराच्या पेशींपर्यंत पोहोचतात आणि आपल्याला आराम देण्याचे कार्य करतात

कोरफड जेलचे फायदे

बाजारातील जेलचा उपयोग करायचा नसेल तर घरात असणाऱ्या कोरफडीच्या रोपट्यातून ताजा गर काढून घ्या. यापासून जेल तयार करा आणि गुडघ्यांना लावा. हलक्या हाताने आपल्या गुडघ्यांचा मसाज करावा. याव्यतिरिक्त शरीराची काळजी घेण्यासाठीही तुम्ही कोरफडीच्या जेलचा वापर करू शकता. यामुळे तुमच्या शरीराला पोषण तत्त्वांचा खोलवर पुरवठा होईल आणि त्वचेवर नैसर्गिक चमक देखील वाढेल. स्नायू लवचिक राहण्यास मदत मिळेल.

​थंड पाण्याने गुडघे शेकणे

थंड पाण्याने गुडघे शेकणे हा उपाय फार जुना आहे. यामुळे रक्त वाहिन्यांना आलेली सूज कमी होईल आणि तसंच त्या भागातील रक्तप्रवाह देखील सुरळीत सुरू राहण्यास मदत मिळेल. या सोप्या उपचारामुळे गुडघेदुखीचा त्रास कमी होईल. याव्यतिरिक्त तुम्ही बर्फाचाही वापर करू शकता. एका कापडामध्ये बर्फाचे काही तुकडे गुंडाळून घ्या आणि ज्या ठिकाणी वेदना होत आहेत तेथे बर्फाने शेक द्या.

​आले

गुडघे आणि कंबरदुखी कमी करण्यासाठी आले देखील लाभदायक आहे. आल्यामध्ये जिंजरॉल असते. हे सांध्यातील वेदना कमी करण्याव्यतिरिक्त स्नायूंमधील ताण कमी करण्यास देखील मदत करते. डॉक्टरांचा सल्ला घेऊन आल्याचे सेवन केल्यास तुम्हाला शारीरिक दुखण्यापासून सुटका मिळू शकते. आल्याचा रस, एक लिंबू आणि अर्धा चमचा मध एकत्र करून रस तयार करा आणि प्या. तसंच आल्याच्या तेलाने तुम्ही आपल्या गुडघ्यांचा मसाज देखील करू शकता. या नैसर्गिक उपायामुळे गुडघ्यांचे दुखणे कमी होण्यास मदत मिळू शकते.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post