न्युट्रिशनिस्टकडून जाणून घ्या कोणते डाएट फॉलो केल्याने दूर होईल डिप्रेशन

 


माय अहमदनगर वेब टीम

हेल्थ डेस्क - शारीरिक आरोग्याप्रमाणेच मानसिक आरोग्य जपणं सुद्धा गरजेचं आहे. खासगी आयुष्यातील समस्या, ऑफिसमधील ताणतणाव इत्यादी कारणांमुळे मानसिक आरोग्यावर दुष्परिणाम होऊ शकतात. मानसिक आजाराला बळी पडण्याचे कोणतेही निश्चित वय किंवा निश्चित कारण नसते. शाळेत जाणारी निष्पाप मुलेही नैराश्यग्रस्त असू शकतात तसंच निवृत्त वयोवृद्ध व्यक्ती देखील या आजाराला बळी पडू शकतात. 

नैराश्य लक्षणे दूर करण्यासाठी आहारामध्ये कोणकोणत्या पदार्थांचा समावेश करावा? याबाबतची सविस्तर माहिती आहारतज्ज्ञ नमित त्यागी यांनी दिली आहे. आहारतज्ज्ञ नमित त्यागी यांनी सांगितलं की, ज्याप्रमाणे मधुमेह, उच्च रक्तदाब, फुफ्फुसे आणि किडनीशी संबंधित आजारांपासून आरोग्याचे संरक्षण करण्यासाठी पोषक आहाराचे सेवन केले जाते. त्याचप्रमाणे मेंदूचे आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी कोणत्या प्रकारचा डाएट फॉलो करावा, याचीही माहिती आपणा सर्वांना असणं आवश्यक आहे. 


​नैराश्य दूर करण्यासाठी असा आहार घेणे आवश्यक

आहारतज्ज्ञ नमित त्यागी यांनी सांगितलं की, ‘आहारातील काही खाद्यपदार्थांचे प्रमाण आवश्यकतेनुसार कमी - जास्त करून आपण नैराश्यासारखे मानसिक आजार तसंच या आजारांशी संबंधित लक्षणांवर नियंत्रण मिळवू शकतो.

यासाठी आहारामध्ये अँटी ऑक्सिडंट्सयुक्त खाद्यपदार्थांचा समावेश करणं आवश्यक आहे. कॉम्प्लेक्स कार्ब, लीन प्रथिने, व्हिटॅमिन-बी कॉम्प्लेक्स, व्हिटॅमिन-बी ९ आणि बी- १२ सारख्या सर्व आवश्यक पोषण तत्त्वांचा समावेश असावा.

​डिप्रेशन टाळण्यासाठी काय खावे?

मेंदू तीक्ष्ण आणि निरोगी राहण्यासाठी येथे नमूद करण्यात आलेल्या सर्व पोषण तत्त्वांसह ओमेगा ३ फॅटी अ‍ॅसिड देखील तितकेच महत्त्वाचे आहे. कारण मेंदूची कार्यप्रणाली सुरळीत सुरू राहण्यासाठी हा घटक खूप उपयुक्त आहे. सोबतच स्मरणशक्ती चांगली राहण्यासाठीही ओमेगा ३ फॅटी अ‍ॅसिड महत्त्वपूर्ण भूमिका निभावते.

​कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट

निरोगी आरोग्यासाठी शरीराला सर्व पौष्टिक पदार्थांचा मर्यादित प्रमाणात पुरवठा होणे आवश्यक आहे. शरीराला योग्य प्रमाणात कार्बोहायड्रेटचा पुरवठा होण्यासाठी आहारामध्ये ब्राउन राइस, क्विनोआ, बाजरी आणि दलियाचा समावेश करावा. या पदार्थांमुळे आपल्या शरीरात दिवसभर ऊर्जा टिकून राहते.

​लीन प्रोटीन कसे मिळवावे?

आहाराद्वारे शरीराला लीन प्रोटीनचाही पुरवठा होणे आवश्यक आहे. लीन प्रोटीन म्हणजे मांसाहाराद्वारे मिळणारे प्रोटीन. मेंदूच्या आरोग्यासाठी लीन प्रोटीन देखील तितकेच महत्त्वाचे आहे. यासाठी डाएटमध्ये चिकन, मासे आणि अंड्याचा समावेश करू शकता.

जर तुम्ही मांसाहाराचे सेवन करत नसाल तर यास पर्याय म्हणून मर्यादित प्रमाणात नियमित सुकामेवा, सोयाबीन, सब्जा, अळशीच्या बियांचा आहारात समावेश करावा.

​अमिनो अ‍ॅसिड

आपले शरीर निरोगी ठेवण्यामध्ये अमिनो अ‍ॅसिडची मोठी भूमिका असते. आपले शरीर अन्नपदार्थांद्वारे मिळणारे पोषक घटक शोषण्याचे कार्य करते. ही प्रक्रिया योग्य पद्धतीने पार पाडण्यामध्ये अमिनो अ‍ॅसिडची महत्त्वाचे भूमिका असते.

शरीराला अमिनो अ‍ॅसिडचा योग्य प्रमाणात पुरवठा व्हावा, यासाठी डाएटमध्ये अख्खे धान्य आणि हिरव्या भाज्या इत्यादी पदार्थांचा समावेश करावा. या पदार्थांच्या सेवनामुळे आपल्या मेंदूमध्ये सेरोटोनिन, डोपामाइन सारख्या निरोगी न्युरोट्रान्समीटरचे उत्पादन वाढते.

या न्युरोट्रान्समीटरची कमतरता निर्माण झाल्यास एखादा व्यक्ती तणाव, चिंता आणि नैराश्यास बळी पडू शकतो. ही समस्या दूर ठेवण्यासाठी आपण आहारात संपूर्ण धान्यांचे सेवन करणं आवश्यक आहे.

​ओमेगा ३ फॅटी अ‍ॅसिड

ओमेगा ३ फॅटी अ‍ॅसिडचा उत्तम स्त्रोत म्हणजे भाज्या आणि दुग्धजन्य पदार्थ. ज्यामध्ये ओमेगा ३ फॅटी अ‍ॅसिडचे प्रमाण सर्वाधिक आहे, अशा पदार्थांचा आहारात समावेश करावा. उदाहरणार्थ अक्रोड, सॅलमन मासा इत्यादी.

या सर्व पदार्थाच्या सेवनामुळे शरीराला मॅग्नेशिअमचा पुरवठा होतो. मॅग्नेशियम समृद्ध आहारामुळे मेंदूला सूज येत नाही. कित्येक अंतर्गत आणि बाह्य प्रक्रियांमुळे आपल्या शरीरातील नसा व त्वचेवर सूज येते. पौष्टिक आहाराचे सेवन न करणाऱ्या लोकांच्या शरीरावर वेगवेगळ्या कारणांमुळे सूज येऊ शकते. यामुळे अन्य आजार उद्भवण्याचीही शक्यता असते. हे नुकसान टाळण्यासाठी नियमित सकस आहाराचे सेवन करावे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post