माय अहमदनगर वेब टीम
नवी दिल्ली - संरक्षण संशोधन आणि विकास संस्था अर्थात (DRDO) च्या क्षमतेत मागील काही काळात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली असून, लष्कर मागेल तसले क्षेपणास्त्र बनवून देऊ, असे डीआरडीओचे प्रमुख जी. सतीश रेड्डी यांनी आज (बुधवार) वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले. येत्या 4 ते 5 वर्षात संपूर्ण क्षेपणास्त्र यंत्रणा विकसित करण्याचा विश्वासही रेड्डी यांनी व्यक्त केला.
कोणत्याही प्रकारचे क्षेपणास्त्र बनविण्याची क्षमता डीआरडीओने प्राप्त केली आहे, त्यामुळे लष्कर मागेल तसले क्षेपणास्त्र बनवून देऊ, असे सांगून रेड्डी पुढे म्हणाले की, गेल्या 40 दिवसांमध्ये एकापाठोपाठ एक अशा 10 क्षेपणास्त्राची चाचणी डीआरडीओने केली आहे. ज्या क्षेपणास्त्रांची चाचणी करण्यात आली आहे, त्यात हायपरसॉनिक क्षेपणास्त्र शौर्य, जास्त रेंजचे ब्रह्मोस, अण्वस्त्र वाहून नेणारे बॅलेस्टिक क्षेपणास्त्र पृथ्वी, हायपरसॉनिक क्षेपणास्त्र तंत्रज्ञान विकास वीइक्लस, अँटी- रॅडिएशन क्षेपणास्त्र रुद्रम 1 आणि सुपरसॉनिक क्षेपणास्त्र असिस्टेड रिलीज टॉरपीडो वेपन सिस्टम यांचा समावेश आहे.
क्षेपणास्त्र विकासाच्या बाबतीत गेल्या पाच ते सहा वर्षात डीआरडीओने मोठी मजल मारली असल्याचे सांगून रेड्डी पुढे म्हणाले की, क्षेपणास्त्र निर्मिती करणाऱ्या खासगी कंपन्यादेखील आता खूप हायटेक झाल्या आहेत. या कंपन्या आमच्यासोबत भागीदारी करण्यासाठी सक्षम झाल्या आहेत. सीमारेषेवर चीनने चालवलेल्या आगळीकीबद्द्ल विचारले असता, रेड्डी म्हणाले की, लष्कराला अत्याधुनिक हत्यारांनी सुसज्ज करण्यासाठी डीआरडीओ कठीण मेहनत करीत आहे. याला आम्ही आमची जबाबदारी समजतो. यामुळे अनेक वेपन सिस्टमवर आम्ही काम करत आहोत. कोरोनाचे संकट कायम असूनही आमचे वैज्ञानिक सातत्याने काम करीत आहेत
Post a Comment