माय अहमदनगर वेब टीम
मुंबई - मुंबईला वीजपुरवठा करणाऱ्या वीज वाहिन्यांत बिघाड झाल्यामुळे सकाळी १० वाजताच्या सुमारास वीज पुरवठा खंडित झाला. तथापि, युद्धपातळीवर तीन साडेतीन तासातच बहुतांश वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला. वीज पुरवठा खंडित झालेल्या घटनेची सर्वंकष चौकशी करण्याचे तसेच यापुढे याची पुनरावृत्ती होणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या अनुषंगाने घेतलेल्या बैठकीत दिले. दरम्यान, पावसाचा परतीचा प्रवास सुरू असताना येणाऱ्या चार दिवसांत मुसळधार पावसाचा अंदाज असून यादृष्टीनेही विजेच्या मागणीचा विचार करून सतर्क राहण्याचे निर्देश यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिले.
मुंबई महानगर क्षेत्रातील वीज खंडित होऊन आज अभूतपूर्व असा गोंधळ उडाला. या प्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज वर्षा येथे तातडीची उच्चस्तरिय बैठक घेतली. या बैठकीस ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत, ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे हे दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते. बैठकीस मुख्य सचिव संजय कुमार, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, महापारेषणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक दिनेश वाघमारे तसेच बेस्ट, टाटा, अदानी या कंपन्यांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. हा बिघाड अनपेक्षित होता की अपेक्षित होता किंवा यात काही गाफिलपणा झाला आहे का, हे तपासण्याचे निर्देश देताना मुख्यमंत्र्यांनी ज्या कारणांमुळे ही घटना घडली त्या वीज वाहिन्यांची दुरुस्ती युद्धपातळीवर करण्यास सांगितले. अशा घटना सलग क्रमाने घडण्याची शक्यता संभवत नसल्या तरी देखील आज ही घटना घडल्यामुळे आपल्याला यापुढील काळात अधिक सावधानता बाळगावी लागेल तसेच यंत्रणेत आवश्यकता भासल्यास अधिक सुधारणा कराव्यात, असे निर्देशही मुख्यमंत्री ठाकरे यांनी यावेळी दिले.
Post a Comment