अखेर 'तो' बिबट्या जेरबंद



माय अहमदनगर वेब टीम

अहमदनगर - मागील चार-पाच दिवसांपासून पाथर्डी परिसरातील बिबट्याच्या शोध मोहिमेला बुधवारी रात्री यश आले. पिंजऱ्यात ठेवलेल्या बोकडाला खाण्याच्या उद्देशाने त्याने झेप घेतली आणि वनविभागाच्या पिंजऱ्यात तो जेरबंद झाला. पकडलेला बिबट्या ही मादी असून, ती नरभक्षक आहे की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. सध्या तरी पकडलेल्या या बिबट्या मादीला जुन्नर परिसरातील रेस्क्यु सेंटरकडे पाठवण्यात आले आहे.

पाथर्डी तालुक्यामध्ये बिबट्याची दहशत मागील पंधरा दिवसापासून आहे. चार दिवसापूर्वी तालुक्यातील शिरापूर येथे एका बालकाला बिबट्याने ठार केले होते. या घटनेनंतर मोठा उद्रेक सर्वत्र झाला. या बिबट्याला तात्काळ जेरबंद करावे अशी मागणी होती. त्यामुळे वन विभागाचे अधिकारी तसेच विशेष पथक, शार्पशूटरही आले होते. बिबट्याला पकडण्यासाठी स्थानिक पातळीवर 60 जणांचे विविध पथके तयार करण्यात आली होती. स्थानिक पातळीवरच्या भिल्ल समाजातील अनेकांची मदतही यासाठी घेण्यात आली. चार दिवसापासून बिबट्याला पकडण्यासाठी दिवस-रात्र शोधमोहीम सुरू होती. बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाने पिंजऱ्यामध्ये बोकड ठेवण्यात आलेले होते. बिबट्याने बोकडाला पकडण्यासाठी झेप घेतल्यानंतर तो या पिंजऱ्यामध्ये अडकला गेला. एका बिबट्याला तालुक्यातील सावरगावमध्ये पकडण्यामध्ये वन विभागाला यश आले. पकडलेला बिबट्याला नगरच्या वनविभागामध्ये हलवण्यात आले, पण नेमका तो नरभक्षक आहे की नाही, याची माहिती वनविभाग घेत आहे. या बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाकडून 14 पिंजरे लावण्यात आले होते. राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, पाथर्डी-शेवगावच्या आमदार मोनिका राजळे, खासदार डॉ. सुजय विखे यांनी शिरापूर येथे जाऊन त्या कुटुंबाचे सांत्वन केले. या बिबट्याचा शोध घेण्यासाठी नगरच्या वनविभागासहित नाशिक, औरंगाबाद येथील विशेष पथक बोलवण्यात आले होते. सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले होते तेथील माहिती सातत्याने पथकांकडून घेतली जात होती. नागरिक भयभीत झाल्यामुळे रात्रीच काय, पण दिवसाही शेतामध्ये जायचे कसे असा प्रश्न त्यांना पडला होता. दोन दिवसापासून बिबट्या वृद्धेश्वर, मायंबा, मढी या परिसरात वावरत असल्याची माहिती मिळाली होती, त्यामुळे वनविभागाने सावरगाव येथे पिंजरा लावला होता, अखेर या पिंजऱ्यामध्ये बिबट्या जेरबंद झाला. बिबट्याच्या हल्ल्यात लहान मुलांसह तीन जणांचा बळी गेला आहे. त्यामुळे बिबट्या पकडल्याची माहिती वनविभागाला देण्यात आल्यानंतर वनविभागाचे अधिकारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी संबंधित बिबट्याला नगर येथे आणले. त्याला जुन्नरच्या रेस्क्यु सेंटरमध्ये पाठवले जाणार आहे. पण, जो बिबट्या पकडण्यात आला, तो नरभक्षक आहे की नाही तसेच बालकांवर हल्ला करणारा तो हाच आहे की नाही, याची आता चर्चा सुरू झाली आहे. 

दरम्यान, पकडण्यात आलेला संबंधित बिबट्या हा आठ वर्षाचा असून ती मादी आहे. त्यामुळे आता नरभक्षक बिबट्या हा सुद्धा सावरगावच्या जवळपासच असू शकतो, असा अंदाज व्यक्त होत आहे.


0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post