पांढरे झालेले केस पुन्हा काळे होऊ शकतात का? जाणून घ्या माहिती

 


माय अहमदनगर वेब टीम

हेेल्थ डेस्क - वाढत्या वयानुसार आपले केस पांढरे होऊ लागतात. वास्तविक केस पांढरे होण्यामागील कारण म्हणजे शरीरामध्ये मेलॅनिन रंगद्रव्याची कमतरता. शरीरात असणाऱ्या मेलॅनिन नावाच्या रंगद्रव्याच्या प्रमाणावर आपल्या केसांचा आणि त्वचेचा नैसर्गिक रंग अवलंबून असतो. जेव्हा शरीरात मेलॅनिनची कमतरता निर्माण होते, त्यावेळेस केस पांढरे होऊ लागतात. 

वृद्धत्वामुळे शरीरामध्ये मेलॅनिनची पातळी कमी होणे स्वाभाविक आहे. पण याव्यतिरिक्त अन्य कारणांमुळेही या रंगद्रव्याची पातळी घटू शकते. जर तुमचे केस अनुवांशिक कारणांमुळे पांढरे झाले असल्यास ते नैसर्गिक स्वरुपात पुन्हा काळे होऊ शकत नाहीत. पण शरीरातील पोषक घटकांच्या अभावामुळे केस पांढरे झाले असतील तर आहारामध्ये योग्य ते बदल करून ही समस्या दूर केली जाऊ शकते. त्यासाठी तज्ज्ञमंडळींचा सल्ला घेणे गरजेचं आहे.

​अनुवांशिक कारणांमुळे केस पांढरे झाल्यास काय करावे?

आपल्या केसांचा रंग मेलॅनिन नावाच्या रंगद्रव्यावर अवलंबून असतो. वयाच्या ३० वर्षांनंतर शरीरातील मेलॅनिनचा स्तर कमी होऊ लागतो. तसंच केस पांढरे होणे ही समस्या व्यक्तीच्या जीवनशैलीमुळेही उद्भवू शकते. तसंच जर तुमच्या आई वडिलांनीही लहान वयातच केस पांढरे होण्याच्या समस्येचा सामना केला असेल तर तुमचेही केस कमी वयातच पांढरे होऊ शकतात. अनुवांशिक कारणांमुळे पांढरे होणारे केस नैसर्गिक स्वरुपात पुन्हा काळे होऊ शकत नाहीत.

​पोषक तत्त्वांच्या कमतरतेमुळे केस होऊ शकतात पांढरे

केसांचे आरोग्य निरोगी राहण्यासाठी पौष्टिक आहाराचे सेवन करणं आवश्यक आहे. शरीरात व्हिटॅमिन बी १२, फॉलेट, कॉपर आणि लोह यासारख्या पोषण तत्त्वांच्या कमतरतेमुळे लहान वयातच केस पांढरे होऊ लागतात. नियमित पौष्टिक आहाराचे सेवन केल्यास शरीराला पोषण तत्त्वांचा पुरवठा होतो. ज्यामुळे केसांना पुन्हा नैसर्गिक रंग मिळू शकतो.

​आरोग्याच्या समस्या असल्यास केस होतात पांढरे

थायरॉइड किंवा अ‍ॅलोपेसिया अ‍ॅरिएटा यासह आरोग्याच्या अन्य समस्यांमुळेही केस पांढरे होऊ शकतात. याव्यतिरिक्त शरीरातील हार्मोनची पातळी असंतुलित झाल्यासही केसांचा रंग बदलतो. शारीरिक आजारांवर योग्य वेळेतच औषधोपचार करणं आवश्यक आहे

​पांढऱ्या केसांची समस्या कशी रोखावी?

वजन नियंत्रणात ठेवा आणि भरपूर पाणी प्या.

प्रदूषण आणि रसायनांच्या संपर्कात येणे टाळा.

आपल्या केसांचे धूळ आणि मातीपासून संरक्षण करा.

ताणतणाव कमी करा.

स्ट्रेस हार्मोनमुळे मेलॅनिनच्या उत्पादनावर परिणाम होतो.

​केसांच्या रंगाबाबतचे काही समज

खरं म्हणजे जर आपले केस नैसर्गिकरित्या पांढरे असतील तर ते नैसर्गिक स्वरुपातच पुन्हा काळे होऊ शकत नाहीत, हे लक्षात घ्यावे. काही लोक केसांचा मूळ रंग पुन्हा आणण्यासाठी एकमेकांना अनेक मार्ग सुचवतात, पण वास्तविक स्वरुपात याचा केसांवर काहीही परिणाम होत नाही.

​हेअर मास्क​

नारळाच्या तेलामध्ये लिंबू मिक्स करून लावल्यास पांढरे केस काळे होऊ शकतात, असा काही लोकांचा समज आहे. खरंतर घरगुती उपचारांमुळे टाळूच्या त्वचेवरील सूज कमी होण्यास मदत मिळते. ज्यामुळे केसांवर नैसर्गिक चमक येते. पण यामुळे केसांचा मूळ रंग पुन्हा येणे कठीणच असते. तुम्ही देखील पांढऱ्या केसांच्या समस्येमुळे त्रस्त आहात तर सर्वप्रथम यामागील कारणं जाणून घ्या. यानंतर केसांचा नैसर्गिक रंग पुन्हा मिळवण्यासाठी कोणते उपाय करावेत, याबाबत डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व त्यानुसार औषधोपचार करावेत.

NOTE प्रत्येकाच्या केसांचा पोत आणि प्रकार वेगळा असतो. त्यामुळे केसांशी संबंधित कोणत्याही समस्या उद्भवल्यास आपल्या ओळखीच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार करावेत.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post