माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - कामगार चळवळ चिरडून टाकण्याचा घाट भाजप सरकारने घातला आहे. टाळेबंदी काळात कामगार विरोधी निर्णय घेऊन कामगारांना देशोधडीला लावण्याचे पाप केले जात आहे. कामगारांना शत्रूप्रमाणे वागणुक देऊन भांडवलदारांची मोदी सरकार पाठराखण करीत आहे. या संकटकाळात एकटे लढल्यास चिरडले जाणार. सर्वांना आपले हक्क अबाधित ठेवण्यासाठी एकत्र येऊन संघर्ष करावा लागणार असल्याचे प्रतिपादन हमाल माथाडी कामगार संघटनेचे अध्यक्ष अविनाश घुले यांनी केले. तर जिल्ह्यात सर्व कामगार संघटना मिळून एक फेडरेशनची स्थापना करण्यास पुढाकार घेण्याचे आवाहन केले.
ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस (आयटक) या कामगार संघटनेच्या शताब्दी वर्षाच्या समारोप निमित्त तोफखाना येथील लालबावटा विडी कामगार युनियन तथा आयटक कामगार केंद्राच्या कार्यालय येथे घेण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात घुले बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून स्वातंत्र्य सैनिक कॉ. गनीभाई शेख, विडी कामगार फेडरेशनचे राज्याध्यक्ष कॉ. कारभारी उगले, भाकपचे राज्य सहसचिव कॉ. सुभाष लांडे, कॉ.महेबुब सय्यद, इंजि. अर्शद शेख, कॉ.बाबा आरगडे, कॉ.अनंत लोखंडे, सतीष भूस, प्रा. प्रदिप मुटकुळे, महादेव पालवे, कॉ.निर्मला न्यालपेल्ली, कॉ.अंबादास दौंड, बहिरनाथ वाकळे, भारती न्यालपेल्ली, सतीश पवार, दीपक शिरसाठ, सगुणा श्रीमल, सतीश निमसे आदींसह विविध समविचारी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
प्रारंभी स्वातंत्र्य सैनिक कॉ. गनीभाई शेख यांच्या हस्ते आयटकचा लाल ध्वज फडकविण्यात आला. तर कॉ.गुरुदास गुप्ता व कॉ. शंकरराव न्यालपेल्ली यांना श्रध्दांजली वाहण्यात आली. लाल बावटेचा जय घोष व लाल सलामने परिसर दुमदुमले. तर इन्कलाब जिंदाबादच्या घोषणा देण्यात आल्या. प्रास्ताविकात जिल्हा सचिव अॅड. कॉ.सुधीर टोकेकर यांनी आयटक संघटनेला मोठा इतिहास असून, लाला लजपतराय यांनी स्थापन केलेल्या या कामगार संघटनेचे अध्यक्षपद अनेक दिग्गज व्यक्तीमत्वांनी भूषवले आहे. जिल्ह्यात कॉ.राम रत्नाकर, कॉ. मल्लेश्याम येमुल व कॉ. शंकर न्यालपेल्ली यांनी आयटकच्या माध्यमातून कामगारांच्या हक्कासाठी संघर्ष केला असल्याचे सांगून, आयटक व जिल्ह्यातील कामगार चळवळीचा आढावा घेतला.
अॅड. कॉ. सुभाष लांडे म्हणाले की, कॉ.गुरुदास गुप्ता यांनी सर्व कामगार संघटनांना एकत्र आनण्याचे महत्त्वाचे काम केले. कामगारांचा लढा यशस्वी होण्यासाठी सर्व संघटना एकत्र येण्याची गरज आहे. अनेक संघर्षानंतर मिळवलेले कामगार कायदे मोडीत काढण्याचे काम सत्ताधारी भाजप सरकार करीत आहे. सर्व क्षेत्रात ठेकेदारी पध्दती रुजत असून, ठेक्याचे सरकार असतित्वात आले आहे. कामगार हिताचे संरक्षण करण्याऐवजी भांडवलदारांचे हित जोपासण्याचे काम केले जात आहे. कामगारांची एकजूटच सरकारला वठणीवर आणू शकते, असे ते म्हणाले. कॉ.बाबा आरगडे यांनी महागाई, बेरोजगारी, शेतकरी व कामगारांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करुन धार्मिक व भावनिक मुद्दयांवर भाजप सरकार नागरिकांचे लक्ष विचलीत करत आहे. भांडवलदारांच्या सरकारला कामगारांच्या एकजुटीतून उत्तर देता येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
कॉ.कारभारी उगले म्हणाले की, सत्ताधारी भाजप वेगवेगळे कायदे करुन कामगार चळवळीची शक्ती काढून घेत आहे. चळवळीत अधिक सक्षम करण्यासाठी एकत्र येऊन चळवळीचे वारसदार निर्माण करण्याची गरज आहे. सध्या अनेक कामगार संघटनांना पेव फुटले असून, संघटनेची दुकानदारी न होता कामगारांच्या न्याय, हक्कासाठी काम केले गेले पाहिजे. परिवर्तन करण्यासाठी संघटित होऊन संघर्ष करण्याची वेळ आली असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते ज्येष्ठ कामगारांचा गौरव करण्यात आला. तसेच विडी कामगार युनियनच्या नुतनीकृत कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनिल गोसावी यांनी केले. आभार बहिरनाथ वाकळे यांनी मानले.
Post a Comment