व्यापाऱ्याच्या बंगल्यावर दरोडा; ८० किलो वजनाची तिजोरी फोडली

 


माय अहमदनगर वेब टीम

कोल्हापूर: करवीर तालुक्यातील वडणगे येथे साई दत्त कॉलनीतील किराणा व्यापारी अनिल सादुले यांच्या बंगल्यात चोरी झाली. चोरट्यांनी १५ तोळे सोन्याचे दागिने, दोन किलो चांदी असा पाच लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. याबाबत अनिल सादुले (वय ५५, मूळ रा. उत्तरेश्वर पेठ, कोल्हापूर) यांनी करवीर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

करवीर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, वडणगे ते निगवे मार्गावर साईदत्त कॉलनी आहे. या परिसरात स्वतंत्र सहा ते सात बंगले आहेत. या ठिकाणी किराणा व्यापारी अनिल सादुले यांचा बंगला आहे. सादुले कुटुंबीय दिवाळीनिमित्त कोल्हापुरातील घरी गेले होते. यादरम्यान चोरट्यांनी त्यांचा बंद बंगल्याच्या खिडकीचे गज वाकवून आत प्रवेश केला. बेडरूममधील ८० किलो वजनाची तिजोरी फोडून दीड तोळ्याच्या सोन्याच्या दोन चेन, एक तोळ्याचे लॉकेट, दीड तोळ्याच्या अंगठ्या, दीड तोळ्याची सोन्याची नाणी, चार ग्रॅमचे कानातील झुमके असे १५ तोळे सोने, दोन किलो चांदी चोरट्यांनी लांबवली.

परिसरातील नागरिकांना चोरीचा प्रकार सोमवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास लक्षात आला. त्यांनी याबाबतची माहिती अनिल सादिले यांना कळवली. सादुले यांनी घरी येऊन पाहणी केली असता, घरातील सर्व साहित्य विस्कटले होते. सोन्याचे व चांदीचे दागिने चोरीस गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी करवीर पोलीस ठाण्यात फोन करून चोरीची माहिती दिली. पोलीस निरीक्षक संदीप कोळेकर, उपनिरीक्षक भोसले यांचे पथक तातडीने घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी पंचनामा करून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post