SRHvsRCB : विल्यमसनने हैदराबादला क्वालिफायरसाठी केले 'क्वालिफाय'



माय अहमदनगर वेब टीम
अबु धाबी - रॉयल चॅलेंजर बेंगलोरच्या १३२ धावांचे आव्हान सनरायझर्स हैदराबादने १९.४ षटकात ४ फलंदाजांच्या मोबदल्यात पार करुन क्वालिफायरमध्ये प्रवेश केला. यामुळे आरसीबीचे आपली पहिल्या वहिल्या आयपीएल विजेतापदाला गवसणी घालण्याचे स्वप्न एलिमनेट झाले. खराब सुरुवात करणाऱ्या हैदराबादला अनुभवी केन विल्यमसनने आपल्या अर्धशतकी खेळीने सावरले. त्याला गोलंदाजीत चमक दाखवणाऱ्या होल्डरने २४ धावांची उपयुक्त खेळी करुन मोलाची साथ दिली. आरसीबीकडून मोहम्मद सिराजने २ तर चहल आणि झाम्पाने प्रत्येकी १ विकेट घेत सुरुवातीच्या षटकात हैदराबादवर दबाव आणला.  

आरसीबीने ठेवलेल्या १३२ धावांचा पाठलाग करताना हैदराबादला सिराजने पहिल्याच षटकात पहिला धक्का दिला. त्याने गोस्वामीला शुन्यावर बाद केले. त्यानंतर कर्णधार डेव्हिड वॉर्नर आणि मनिष पांडेने दुसऱ्या विकेटसाठी ४१ धावांची भागिदारी करत संघाला चांगली सुरुवात करुन देण्याचा प्रयत्न केला. पण, सिराजने वॉर्नरला १७ धावांवर बाद करत ही जोडी फोडली. त्यानंतर २४ धावा करणारा मनिष पांडेही झाम्पाच्या गोलंदाजीवर बाद झाल्याने हैदराबादची अवस्था १ बाद ४३ वरुन ३ बाद ५५ धावा अशी झाली. 

सिराज आणि झाम्पाने हैदराबादची वरची फळी गारद केल्यानंतर चहलनेही प्रियम गर्गला ७ धावांवर बाद करत हैदराबादच्या अडचणीत वाढ केली. या पडझडीनंतर हैदराबादचा अनुभवी फलंदाज केन विल्यमसनने डाव सावरत संघाला १५ व्या षटकात ८७ धावांपर्यंत मजल मारून दिली. सेट झाल्यानंतर विल्यमसनने आक्रमक फलंदाजी करत आरसीबीच्या धावसंख्येचा वागाने पाठलाग सुरु केला. आता हैदराबादला विजयसाठी १८ चेंडूत २८ चेंडूत गरज होती. दरम्यान, विल्यमसनने अर्धशतक पूर्ण केले. विल्यामसन आणि त्याला साथ देणाऱ्या होल्डरने सामना ६ चेंडूत ९ धावा असा आणला. अखेरच्या षटकात होल्डरने नवदीप सैनीला दोन चौकार मारत सामना जिंकून दिला. विल्यमसनने ४४ चेंडूत नाबाद ५० धावा केल्या तर होल्डरने २० चेंडूत २४ धावांची उपयुक्त खेळी केली. 

तत्पूर्वी, हैदराबादने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेत आरसीबीला सुरुवातीलाच मोठे धक्के दिले. जेसन होल्डरने कर्णधार विराट कोहली ( ६ ) आणि देवदत्त पडिक्कल ( १ ) यांना स्वस्तात माघारी धाडले. त्यानंतर फिंच आणि एबी डिव्हिलियर्सने आरसीबीला सावरण्याचा प्रयत्न केला. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी ४१ धावांची भागिदारी केली. 

पण, नदीमने ३२ धावांवर खेळणाऱ्या फिंचला बाद करत ही जोडी फोडली. पाठोपाठ मोईन अलही आल्या आल्या शुन्यावर धावबाद झाला. त्यामुळे आरसीबीची १०.४ षटकात ४ बाद ६२ धावा अशी झाली. मात्र त्यानंतर अनुभवी डिव्हिलियर्सने आरसीपीचा डाव सावरत संघाला शतकाच्या जवळ पोहचवले. पण, त्यानंतर होल्डरने पुन्हा हैदराबादला यश मिळवून देत शिवम दुबेला ८ धावांवर बाद केले. त्यामुळे आरसीबीच्या १५.४ षटकात ५ बाद ९९ अशी अवस्था झाली. त्यानंतर आलेला वॉशिंग्टन सुंदरही ५ धावांची भर घालून माघारी परतला. 

आरसीबीला समाधानकारक धावसंख्या उभारून देण्याची जबाबदारी आलेल्या डिव्हिलियर्सनेही १८ व्या षटकात आरसीबीची साथ सोडली. त्याला नटराजनने ५६ धावांवर बाद केले. त्यानंतर हैदराबादच्या गोलंदाजांनी टिच्चून मारा केला. त्यांनी आरसीबीला २० षटकात ७ बाद १३१ धावात रोखले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post