Add caption |
माय अहमदनगर वेब टीम
मुंबई: वास्तुविषारद अन्वय नाईक यांच्या आत्महत्येप्रकरणी अटक करण्यात आलेले रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना अलिबाग कोर्टाकडून १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान, अर्णब यांच्यावतीने लगेचच कोर्टात जामिनासाठी अर्ज करण्यात आला असून त्या अर्जावर आता उद्या सुनावणी होणार आहे. त्यामुळे आजची रात्र त्यांना न्यायालयीन कोठडीतच काढावी लागणार आहे.
अर्णब यांना मुंबईतील निवासस्थानातून आज सकाळी अटक करण्यात आले होते. मुंबई पोलीस आणि रायगड पोलिसांनी संयुक्तपणे ही कारवाई केली होती. या कारवाईनंतर त्यांना अलिबाग कोर्टात हजर करण्यात आले होते. आपल्याला पोलिसांकडून मारहाण करण्यात आल्याचा दावा अर्णब यांनी कोर्टात केल्यानंतर त्यांची वैद्यकीय तपासणी करण्याचे निर्देश कोर्टाने दिले होते. त्यानुसार वैद्यकीय तपासणी झाली व आता कोर्टाने अर्णब यांना १८ नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. पोलिसांकडून कोर्टात अर्णब यांना पोलीस कोठडी देण्याची मागणी करण्यात आली होती मात्र कोर्टाने ती फेटाळली. 'पोलिसांनी पूर्वी दिलेल्या क्लोजर रिपोर्टला कोणीही आव्हान दिलेले नाही. त्यामुळे तो अजूनही अस्तित्वात आहे आणि आता आरोपीकडून काय हस्तगत करायचे आहे, नेमकी काय चौकशी करायची आहे, याविषयी पालिसांनी सकृतदर्शनी ठोस काही दाखवलेले नाही आणि ठोस पुरावे दिलेले नाहीत', असे निरीक्षण यावेळी कोर्टाने नोंदवले.
दरम्यान, अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी अलिबागमध्ये दाखल एफआयआर रद्द करावा, अशी विनंती करत पत्रकार अर्णब गोस्वामी यांनी मुंबई हायकोर्टात धाव घेतली आहे. त्यांच्या अर्जावर उद्या दुपारी ३ वाजता सुनावणी होण्याची शक्यता आहे. तिथेही अर्णब यांच्यावतीने जामीन अर्ज केला जाऊ शकतो, असे सांगण्यात आले.
मुलीने केली होती नव्याने तक्रार
अन्वय नाईक आणि त्यांची आई कुमुद नाईक यांनी अलिबागमधील कावीर येथील घरात मे २०१८ मध्ये आत्महत्या केली होती. अर्णब गोस्वामी, आयकास्ट स्लॉशस्काय मीडियाचे फिरोज शेख, स्मार्ट वर्क्सचे सारडा या तिघांनी एकूण ५ कोटी ४० लाख रुपये थकवल्यामुळे आपण आत्महत्या करत असल्याचे अन्वय नाईक यांनी सुसाइड नोटमध्ये नमूद केले होते. याप्रकरणी अलिबाग पोलिसांनी सुसाइड नोटच्या आधारे तिघांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला होता. गेल्यावर्षी या प्रकरणाची फाइल बंद करण्यात आली होती. दरम्यान, अन्वय नाईक यांची पत्नी व मुलगी मात्र सातत्याने याप्रकरणी चौकशीची मागणी करत होते. अन्वय यांची मुलगी आज्ञा हिने मे महिन्यात नव्याने तक्रार केली होती. त्या तक्रारीच्या आधारे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी याप्रकरणी फेरचौकशीचे आदेश दिले असून त्यानुसारच अर्णब यांना अटक करण्यात आली आहे.
Post a Comment