माय अहमदनगर वेब टीम
मुंबई: राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून कुणाची वर्णी लागणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागलेले असताना अखेर राज्य सरकारच्या वतीने आज १२ नावांची यादी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. सरकारच्यावतीने संसदीय कार्यमंत्री अॅड. अनिल परब, अल्पसंख्याक कार्यमंत्री नवाब मलिक आणि सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी राज्यपालांची राजभवन येथे भेट घेऊन बंद लखोट्यात ही यादी सादर केली.
महाराष्ट्र विधान परिषदेत राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून १२ सदस्यांची वर्णी लागणार आहे. सत्ताधारी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांकडून प्रत्येकी ४ जणांना यात संधी मिळणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ही नावे आधीच निश्चित करण्यात आली होती. त्यानंतर बराच खल होऊन ही नावे अखेर आज राज्यपालांकडे पाठवली गेली आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे विनंती पत्र तसेच मंत्रिमंडळाने मागील आठवड्यात मंजूर केलेल्या प्रस्तावासह सर्व नावे सीलबंद पाकिटात राज्यपालांकडे सुपूर्द केली आहेत. ही नावे देताना सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे, अशी माहिती अनिल परब यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना दिली. राज्यपाल लवकरच या नावांना मान्यता देतील अशी अपेक्षा देखील त्यांनी व्यक्त केली. या यादीत शिवसेनेकडून उर्मिला मातोंडकर, राष्ट्रवादीकडून एकनाथ खडसे व राजू शेट्टी, काँग्रेसकडून रजनी पाटील, सचिन सावंत यांच्या नावांचा समावेश करण्यात आल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
अशी आहेत संभाव्य १२ नावे...
शिवसेना: उर्मिला मातोंडकर (कला), नितीन बानगुडे पाटील, विजय करंजकर, चंद्रकांत रघुवंशी
राष्ट्रवादी काँग्रेस: एकनाथ खडसे (समाजसेवा आणि सहकार), राजू शेट्टी (सहकार आणि समाजसेवा), यशपाल भिंगे (साहित्य), आनंद शिंदे (कला)
काँग्रेस: रजनी पाटील (समाजसेवा आणि सहकार), सचिन सावंत (समाजसेवा आणि सहकार), मुझफ्फर हुसेन (समाजसेवा), अनिरुद्ध वनकर (कला)
राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून कला, साहित्य, समाजसेवा आणि सहकार या चार क्षेत्रांशी संबंधित व्यक्तीची वर्णी लागते. या निकषांच्या आधारे महाविकास आघाडीने १२ नावे निश्चित करून राज्यपालांना सादर केली असून त्यास राज्यपाल मंजुरी देतात की ही यादी फेटाळतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Post a Comment