मुंबई ; रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्याविरोधात आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अटकेची कारवाई करत असताना सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी तसेच महिला पोलीस अधिकाऱ्यावर हल्ला केल्याच्या आरोपाखाली मुंबईतील ना. म. जोशी मार्ग पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वास्तुविषारद अन्वय नाईक यांच्या आत्महत्येप्रकरणी आज अर्णब गोस्वामी यांना त्यांच्या मुंबईतील निवासस्थानातून अटक करण्यात आली. पोलिसांकडे अर्णब यांच्या अटकेसाठी रितसर वॉरंट होता आणि त्यानुसारच पोलिसांनी कारवाई केली. मात्र, या कारवाईदरम्यान अर्णब यांनी अडथळा आणण्याचा प्रयत्न केला. कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांना विरोध करण्यात आला. कारवाईवर आक्षेप घेण्यात आला. त्यामुळेच अर्णब यांच्याविरुद्ध पोलिसांनी सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. अर्णब यांना अटक करतानाचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. त्यात अर्णब हे पोलिसांशी हुज्जत घालताना व अटकेस मनाई करताना दिसत आहेत. त्यात एका महिला पोलिसाचाही आवाज ऐकू येत आहे. त्यात कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांना एक तास घराबाहेर उभे करण्यात आले होते, असा उल्लेख आढळतो. ही बाब लक्षात घेता आता अटकेत असलेल्या अर्णब यांच्या अडचणी दुसरा गुन्हा दाखल झाल्यानंतर आणखी वाढण्याची शक्यता आहे.
Post a Comment