माय अहमदनगर वेब टीम
पुणे: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुणे येथे येऊन सीरम इन्स्टिट्युटला भेट दिल्यानंतर सीरमचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला यांनी पत्रकार परिषद घेऊन पंतप्रधानांच्या भेटीविषयी माहिती दिली. आजच्या भेटीत करोनावरील लस आणि लसीकरण याबाबत पंतप्रधान मोदी यांच्यासोबत सखोल चर्चा झाली, असे पूनावाला यांनी नमूद केले व करोनावरील लसीचे वितरण सर्वप्रथम भारतात होणार, अशी खूप मोठी दिली.
पंतप्रधान मोदी यांच्या सीरम भेटीविषयी अदर पूनावाला यांनी दिलेली माहिती करोना लसीच्या प्रतीक्षेत असलेल्या देशवासीयांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. करोनावरील लस लवकरच येणार, हेसुद्धा यानिमित्ताने स्पष्ट झाले आहे. सध्या करोना लसचाचणी तिसऱ्या टप्प्यात आहे. या चाचणीकडे आमचे लक्ष लागले आहे, असे नमूद करताना लसींच्या साठवणुकीसाठी आपल्याकडे पुरेशी आणि सक्षम व्यवस्था असल्याचे पूनावाला यांनी सांगितले. संपूर्ण भारतात या लसींचे किती डोस लागणार याबाबत लेखी स्वरूपात भारत सरकारने अद्याप काहीही सांगितलेले नसले तरी सीरमने जुलै २०२१ पर्यंत ३० ते ४० कोटी लस उत्पादित करण्याचे लक्ष्य ठेवले आहे, असे पूनावाला यांनी नमूद केले.
लसींबाबत देशाचं आरोग्य मंत्रालय अंतिम निर्णय घेईल. एकदा त्यावर शिक्कामोर्तब झालं की सर्वप्रथम या लसींचं वितरण भारतात करण्यात येईल. त्यानंतर कोव्हॅक्स देशांत लसपुरवठा केला जाईल. यात प्रामुख्याने आफ्रिकन देशांचा समावेश आहे. ब्रिटनसह युरोपमध्ये लस वितरणाची जबाबदारी अॅस्ट्राझेनेका आणि ऑक्सफर्ड यांची असणार आहे, असेही पूनावाला यांनी नमूद केले.
Post a Comment