माय अहमदनगर वेब टीम
सोलापूर - ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना वीज कंपन्यांवर विश्वास आहे, मात्र ग्राहकांवर नाही, हे निंदनीय आहे. इतकेच नव्हे तर वीजबिलासंदर्भात आंदोलने करणाऱ्या भाजपने वीजबिल घेऊन यावे ते आपण तपासून देऊ असे सांगणारे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी "मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा आणि त्यानंतर बिल तपासणीसाठी इन्स्पेक्टर म्हणून बसावे"असा टोला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी राऊत यांना लगावला आहे. बिल तपासणीसाठी इन्स्पेक्टर म्हणून बसल्यानंतरच आम्ही बिल तपासण्यासाठी आणू असेही दरेकर यावेळी बोलताना म्हणाले.
पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसंदर्भात शुक्रवारी सोलापुरात आल्यानंतर आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत दरेकर बोलत होते. जी वीजबिले पाठवली ती योग्य कशी आहेत ते पटवण्यासाठी मेळावा घेत आहेत हे निंदनीय असल्याचे सांगत १०० युनिट मोफत वीज देऊ म्हणणाऱ्यांनी यु-टर्न मारला असल्याचे दरेकर यांनी स्पष्ट केले. ग्राहकांना वीजबिलात सवलत देखील दिली नाही, उलट जखमेवर मीठ चोळत आहेत. मूळ प्रश्नाला बगल देण्यासाठी चौकशीचा मुद्दा पुढे करत आहेत, असे सांगत चौकशी लावून मूळ मुद्यापासून पळता येत नाही असे दरेकर म्हणाले.
मुख्यमंत्री, अर्थमंत्री, ऊर्जामंत्री एकत्रित बसून १० मिनिटांत हा मुदा सोडवू शकतात मात्र त्यांच्यामध्ये कोणताही ताळमेळ नसल्याचे दरेकर यांनी सांगितले. राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्रित येऊन काँग्रेसला जनतेसमोर तोंडघशी पाडण्याचे काम सुरू असल्याचे दिसत आहे. काँग्रेसची महाविकास आघाडी मध्ये फरपट सुरू आहे असं दिसतं आहे मात्र, दुर्दैवाने काँग्रेसकडे देखील स्वाभिमान नाही, धाडस नाही असा सणसणीत टोलाही प्रवीण दरेकर यांनी लगावला. वाढीव वीज बिलांसदर्भात भाजपची भूमिका अतिशय आक्रमक आहे. येत्या सोमवारी राज्य सरकारच्या वाढीव वीज बिलाच्या निषेधार्थ वीज बिल होळीचे आंदोलन होणार आहे. त्यामुळे ग्राहकांच्या प्रश्नांची जराही काळजी सरकारला असेल तर वाढीव वीज बिलासाठी सरकारने तात्काळ ५ हजार कोटीचे पॅकेज द्यावी अशी आमची मागणी आहे, असे दरेकर म्हणाले.
पुणे पदवीधर मतदार संघ हा पारंपरिक भाजपाला मतदान करणारा मतदार संघ आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सलग दोन वेळा या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. त्यांनी पदवीधरांसाठी, शिक्षकांसाठी सरकारच्या माध्यमातून मंत्री म्हणून जे काम केले त्याचा उपयोग या उमेदवारांना मिळणार, असा विश्वास दरेकर यांनी व्यक्त केला.
Post a Comment