मुंबई - विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी शिवसेनेचा उल्लेख 'शवसेना' असा केल्याने शिवसेना आणि भाजमधील तणाव आणखी वाढण्याची चिन्हे आहेत. महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती आणि शिवसेना प्रवक्त्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी एका निवेदनाद्वारे अमृता फडणवीस यांना प्रत्युत्तर दिले आहे. त्यात एका शब्दालाही किती महत्त्व असते हे सांगण्यासाठी अमृता या नावाचा फोड करत टीकेचा बाण डागण्यात आला आहे.
'का हय ये - शवसेना ने अपने ही साथियों की लाशें बिछा दी बिहार में! काय चाल्लय तरी काय - शवसेनेने आपल्याच साथीदारांना ठार मारले बिहारमध्ये! महाराष्ट्र कुठेही नेलेला असो पण बिहार योग्य ठिकाणी नेऊन ठेवल्याबद्दल धन्यवाद', अशा प्रकारचे ट्वीट करत अमृता फडणवीस यांनी शिवसेनेला डिवचले होते. या ट्वीटमध्ये अमृता यांनी शिवसेनेचा उल्लेख 'शवसेना' असा केल्यानेच वादाची ठिणगी पडली आहे. अमृता यांच्या या टीकेला शिवसेनेकडून त्याच भाषेत प्रत्युत्तर देण्यात आले असून यंदा दिवाळीत फटाके फोडायचे नसले तरी ऐन दिवाळीत शिवसेना-भाजपमधील आरोप-प्रत्यारोपांची फटकेबाजी मात्र रंगणार असेच यावरून दिसत आहे.
'शवसेना' या शब्दावरून 'एका शब्दाचे महत्त्व असते' असे नमूद करतच शिवसेना प्रवक्ता नीलम गोऱ्हे यांनी अमृता यांच्यावर निशाणा साधला आहे. 'अमृता या शब्दातील 'अ' चे भान महत्त्वाचे आहे. अमृताताई आपण या दीपावलीच्या दिवसांत अमंगल विचार मनात आणू नयेत. शिवसेनेला अभद्र नावे ठेवून आपले कल्याण होणार नाही', असा इशाराच गोऱ्हे यांनी अमृता यांना दिला आहे. आपल्या नावातील 'अ' मृतावस्थेत जावू देवू नका, मोदीजी सांगतात तसा अधूनमधून योगा करत जा, म्हणजे मन:स्वास्थ्य चांगले राहते आणि हो शिवसेनाच रुग्णवाहिका आणि अंतिम शव वाहिनीच्या वेळेस सगळ्यात आधी आठवते हे देखील आज विसरू नका, असा टोलाही गोऱ्हे यांनी अमृता फडणवीस यांना लगावला आहे. आपल्या नावात 'अ' चं महत्त्व आहे आणि ते निघाले तर 'मृता' उरेल, असे नमूद करताना तुम्ही शिवसेनेची काळजी न करता स्वत:चे मानसिक स्वास्थ्य जपा, असा खरमरीत सल्लाही गोऱ्हे यांनी अमृता यांना दिला आहे. 'अ' मंगल विचार मनात आणणे 'अ' योग्य बरे का, असे खोचकपणे सुनावताना ही दीपावली आपल्या बुद्धीत ज्ञानाचा प्रकाश टाकणारी जावो, असेही नीलम गोऱ्हे यांनी शेवटी नमूद केले आहे.
Post a Comment