सुपरनोवाजचा सामना आत्मविश्वास दुणावलेल्या ट्रेलब्लेजर्सशी होणार

 


माय अहमदनगर वेब टीम

शारजाह - गतविजेता सुपरनोवाज संघाला महिला टी-20 चॅलेंज स्पर्धेत आपले आव्हान कायम ठेवायचे असेल तर, शनिवारी आत्मविश्वास दुणावलेल्या ट्रेलब्लेजर्स संघाविरुद्ध त्यांना विजय मिळवावा लागेल. वेलोसिटी संघावर गुरुवारी मोठा विजय मिळवत आत्मविश्वास दुणावलेल्या स्मृती मानधनाच्या नेतृत्वाखाली खेळणार्‍या ट्रेलब्लेजर्सचे लक्ष्य आणखीन एक विजय मिळवण्याचे असणार आहे. या सामन्यात विजय मिळवल्यास त्यांच्या नावावर दोन विजय होतील आणि जेणेकरून नऊ नोव्हेंबरला होणार्‍या अंतिम सामन्यात त्यांचा प्रवेश निश्चित होईल. त्यांचा सामना सुपरनोवाज संघाशी होणार असून, स्पर्धेच्या पहिल्या लढतीत त्यांना वेलोसिटी संघाने पराभूत केले होते. आणखीन एक पराभव त्यांना मिळाल्यास स्पर्धेतील त्यांचे आव्हान संपुष्टात येऊ शकते. ट्रेलब्लेजर्स संघाने वेलोसिटी संघाविरुद्ध चांगली कामगिरी केली आणि त्यांना अवघ्या 47 धावांतच गुंडाळले.ज्यामध्ये इंग्लंडची फिरकी गोलंदाज सोफी एक्लेस्टोनने महत्त्वाची भूमिका पार पाडली. टी-20 च्या गोलंदाजांच्या जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या सोफीने नऊ धावा देत चार विकेटस् मिळवल्या. त्यांच्या गोलंदाजांची हीच कामगिरी हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली असलेल्या सुपरनोवाजविरुद्ध देखील चांगली राहील, अशी अपेक्षा कर्णधार स्मृती मानधनाला असेल.


सुपरनोवाज संघाला या लढतीत विजय मिळवणे महत्त्वाचे आहे जेणेकरून नेट रनरेटच्या आधारे संघांचा अंतिम सामन्यातील प्रवेश ठरेल. असे झाल्यास वेलोसिटी संघ बाहेर जाण्याची शक्यता आहे. कारण, त्यांचा नेट रनरेट (-1.869) असा आहे. सुपरनोवाज या सामन्यात पराभूत व्हावा असे वेलोसिटी संघाला वाटत असेल. त्यामुळे त्यांना अंतिम सामन्यात पोहोचता येईल. भारतीय टी-20 संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर सुरुवातीच्या सामन्यातील आपला फॉर्म कायम ठेवण्याचा प्रयत्न करेल आणि श्रीलंकेची चमारी अट्टापट्टू आपल्या पहिल्या लढतीतील खेळीची पुनरावृत्ती करेल अशी अपेक्षा संघाला असेल. शारजाहची खेळपट्टी ही धीमी होत आहे. त्यामुळे फिरकी गोलंदाजांची भूमिका महत्त्वाची ठरण्याची शक्यता आहे. ट्रेलब्लेजर्ससाठी पुन्हा एकदा गोलंदाजीची जबाबदारी सोफी एक्लेस्टोनवर असेल. तिला फिरकी गोलंदाज राजेश्वरी गायकवाड आणि अनुभवी गोलंदाज झुलन गोस्वामी यांची मदत मिळेल. सुपरनोवाज आणि ट्रेलब्लेजर्स दोन्ही संघांकडे चांगले स्पिनर आहेत. त्यामुळे या लढतीत चांगली चुरस पाहायला मिळेल.


सुपरनोवाज : हरमनप्रीत कौर (कर्णधार), जेमिमाह रॉड्रिग्स (उपकर्णधार), चमारी अट्टापट्टू, प्रिया पुनिया, अनुजा पाटील, राधा यादव, तानिया भाटिया (यष्टिरक्षक), शशिकला सिरीवर्धने, पूनम यादव, शकीरा सेल्मन, अरुंधती रेड्डी, पूजा वस्त्राकर, आयुषी सोनी, अयाबोंगा खाका, मुस्कान मलिक.


ट्रेलब्लेजर्स : स्मृती मानधना (कर्णधार), दीप्ती शर्मा (उपकर्णधार), पूनम राऊत, ऋचा घोष, डी. हेमलता, नुजहत परवीन (यष्टिरक्षक), राजेश्वरी गायकवाड, हरलीन देओल, झुलन गोस्वामी, सिमरन दिल बहाद्दूर, सलमा खातून, सोफी एक्लेस्टोन, नाथकन चंथाम, डिंड्रा डॉटीन, काशवी गौतम.


सामना भारतीय वेळेनुसार 7.30 वाजता.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post