माय अहमदनगर वेब टीम
कल्यान ; मध्य रेल्वेच्या आटगाव ते कसारा रेल्वे स्थानकांदरम्यान दोन मद्यधुंद तरुणांनी चालत्या लोकलमध्ये एका तरुणीचा विनयभंग केला. या तरुणीने प्रतिकार केला असता त्यांनी तिला चक्क चालत्या गाडीतून ढकलून देण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत लोकल कसारा रेल्वे स्थानकात पोहोचल्याने तरुणीचा जीव वाचला. या घटनेने लोकलमधील महिला प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.
कसारा येथे राहणारी ही २१ वर्षीय तरुणी ठाण्यात मॉलमध्ये वरिष्ठ पदावर काम करते. २५ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी ती कामावरून परतत होती. आटगाव स्थानकात डब्यातील सर्व महिला प्रवासी उतरल्याने ती तरुणी डब्यात एकटीच राहिली. हे पाहून आटगाव स्थानकात दोन तरुणांनी पुरुषाच्या डब्यातून उतरून चालत्या गाडीत महिलांच्या डब्यात प्रवेश केला. दोघेही नशेत होते. या तरुणांनी तरुणीकडे पाहून आक्षेपार्ह वर्तन सुरू केले. प्रसंगावधान राखत तिने मोबाइलने या दोघांचे छायाचित्र काढून तातडीने नातेवाईकांना पाठवून या प्रकाराची कल्पना त्यांना दिली. घरच्यांनी तातडीने कसारा स्थानकात धाव घेतली. या दरम्यान या दोघांनी या तरुणीशी लगट करण्याचा प्रयत्न केला असता तिने सर्व ताकद एकवटून त्यांना प्रतिकार केला. हातातील पर्सने तिने त्यांना फटकावले. या झटापटीनंतर दोन्ही तरुणांनी तिला लोकलबाहेर फेकण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत लोकल कसारा स्थानकात पोहोल्याने तरुणीचा जीव वाचला.
गाडीचा वेग कमी झाल्याची संधी साधत यातील एकजण चालत्या गाडीतून उडी मारून पळून गेला. मात्र तरुणीने दुसऱ्याचे बखोट धरून ठेवले. गाडी स्थानकात थांबताच तरुणीच्या ओरड्यामुळे जमा झालेल्या नागरिकांनी आणि नातेवाईकानी या मद्यधुंद तरुणाला चोप देत त्याला रेल्वे पोलिसांच्या स्वाधीन केले. या तरुणाला अटक करत कल्याण लोहमार्ग पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. यानंतर या तरुणाकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे दुसऱ्या आरोपीलाही पोलिसांनी ताब्यात घेतले. अमोल जाधव आणि अमन हिले अशी या आरोपींची नावे असून ते देखील ठाण्यातील एका कंपनीतील कर्मचारी आहेत.
Post a Comment