बिहारमध्ये पुढे काय होणार?; तेजस्वी यांच्याबाबत पवारांचे खूप मोठे विधान

 


माय अहमदनगर वेब टीम

पूणे - बिहार विधानसभा निवडणुकीत एका बाजूला पंतप्रधान नरेंद्र मोदी, बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार आणि भाजपचे सर्व नेते प्रचारामध्ये होते तर दुसऱ्या बाजूला एक अनुभव नसलेला तरुण नेता निवडणूक लढवत होता, त्यामुळे तेजस्वी यादव यांना जेवढ्या काही जागा मिळताहेत ती त्यांची 'अचीवमेंट' म्हणावी लागेल. तेजस्वी यादव यांच्या या यशामुळे तरुणांना प्रेरणा मिळेल. इन्स्पिरेशन मिळेल आणि इतरांनाही मार्ग दिसेल, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बिहार विधानसभा निवडणूक निकालांवर मतप्रदर्शन केलं. 

बिहारच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस काही जागा लढवत होती. परंतु, तेजस्वी यादव यांना मदत व्हावी यासाठी आम्ही या निवडणुकीकडे फारसं लक्ष दिलं नाही, असे एका प्रश्नाच्या उत्तरात पवार म्हणाले. बिहारमध्ये काँग्रेसच्या पदरी मोठं अपयश पडताना दिसत आहे. त्याबाबत विचारलं असता राजद आणि काँग्रेस यांच्यामध्ये जागावाटप कसं ठरलं होतं, याबद्दल मला माहिती नाही. त्यामुळे त्याबद्दल बोलता येणार नाही, असे पवार म्हणाले.

देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे बिहारमध्ये भाजपच्या जागा वाढल्याचा दावा केला जात आहे. भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी तर तसे जाहीर विधानही केले आहे. त्याबद्दल शरद पवार यांना विचारलं असता, आमच्या डोक्यात ही गोष्ट आली नव्हती ती आणून दिल्याबद्दल धन्यवाद, असा टोला पवार यांनी लगावला. बिहारमधील निवडणूक निकालाचा परिणाम इतर राज्यांवर कसा होईल हे सांगता येणार नाही. तामिळनाडूमध्ये तर परिणाम होईल असं वाटत नाही आणि पश्चिम बंगालमध्ये काय होईल हे बघावे लागेल, असे उत्तर एका प्रश्नावर पवार यांनी दिले.

राज्यपालांबद्दलही बोलले

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी अर्णब गोस्वामी यांची सुरक्षा व आरोग्याबाबत गृहमंत्री अनिल देशमुख यांना फोन करून चिंता व्यक्त केली होती. त्याबाबत विचारले असता, 'राज्यपालांनी अर्णब गोस्वामी यांच्या काळजीपोटी फोन केला ही चांगली गोष्ट आहे परंतु, ज्या कुटुंबातील दोन व्यक्तींचा मृत्यू झाला आहे त्यांच्याबद्दलही थोडी सहानुभूती त्यांनी दाखवली असती तर बरं झालं असतं, असे पवार म्हणाले. नाईक कुटुंब मला भेटल्याचे जे फोटो व्हायरल होत आहेत पाच वर्षांपूर्वीचे आहेत, असेही पवार यांनी स्पष्ट केले.

पवार म्हणाले...

- रयत शिक्षण संस्थेच्यावतीने मदतीचा चेक सुपूर्द करण्यासाठी मी काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटलो होतो. या भेटीत राजकारणावरती आणि विधानपरिषदेच्या जागांबद्दल कोणतीही चर्चा झाली नाही. 

- अमेरिकेतील निवडणूक निकालानंतर डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून केली जात असलेली वक्तव्य ही त्यांच्या वयाला शोभणारी नाहीत.

- करोना पसरू नये याबाबत काळजी घेण्याची गरज आहे. पंतप्रधानांनी किंवा इतर महत्त्वाच्या व्यक्तींनी देखील याबद्दल आवाहन केले आहे. त्यामुळे यावेळी दिवाळीत लोकांना न भेटण्याचा निर्णय घेतलाय बाकी काही नाही.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post