माय अहमदनगर वेब टीम
मुंबई : राज्यातील लाखो रुग्णांसाठी ‘महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना खरोखर जीवनदायी ‘ ठरली आहे. करोना काळात ज्या वेळी केवळ खासगीच नव्हे तर पालिका व शासकीय रुग्णालयातही सामान्य रुग्णांवर उपचार करणे टाळले जात होते तेव्हापासून म्हणजे एप्रिलपासून ते २९ ऑक्टोबरपर्यंत महात्मा फुले जन आरोग्य योजनेतून तब्बल ६ लाख २५ हजार रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत. यात ३,११,२५५ करोना रुग्णांचा समावेश आहे. जवळपास ३,१३,६५५ सामान्य रुग्णांवर उपचार करण्यात आले असून यात सुमारे एक लाख कर्करुग्णांवर उपचार करण्यात आले. यात रेडिएशन, केमोथेरपी तसेच शस्त्रक्रिया यांचा समावेश आहे.
जवळपास ४४,८५८ डायलिसिस करण्यात आल्याचे ‘महात्मा फुले जन आरोग्य योजने’चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधाकर शिंदे यांनी सांगितले. शासकीय व निमशासकीय रुग्णालये तसेच करोनासाठीच्या रुग्णालयांत तीन लाखाहून अधिक करोना रुग्णांवर मोफत उपचार करण्यात आले आहेत. यातील सुमारे ७५ हजार रुग्णांची विमा कागदपत्रे योजनेच्या पोर्टलवर अद्यावत आहेत. करोना उपचारात जवळपास सर्व सरकारी यंत्रणा गुंतल्यामुळे विम्याची कागदपत्रं तयार होण्यास वेळ लागत असला तरी या सर्व रुग्णांना उपचारासाठी एक पैसाही खर्च आलेला नाही.
करोनाच्या गेल्या सहा महिन्यात कॅन्सर रुग्ण, गर्भवती महिला तसेच हृदयविकाराच्या रुग्णांसह वेगेवेगळ्या शस्त्रक्रियांसाठीच्या रुग्णांचे अतोनात हाल लक्षात घेऊन महात्मा फुले जन आरोग्य योजनेने २३ मे रोजी सर्वप्रथम आदेश काढून रुग्णोपचाराची व्याप्ती वाढवली. यापूर्वी पिवळ्या व केशरी शिधापत्रिका धारकांनाच या योजनेचा लाभ मिळत होता. तो वाढवून पांढरी शिधापत्रिका असलेल्यांचाही समावेश या योजनेत केल्यामुळे राज्यातील तब्बल १२ कोटी लोक योजनेचा लाभ घेऊ शकत होते. यापूर्वीच्या योजनेत केवळ ४४० रुग्णालयातच उपचार मिळण्याची व्यवस्था होती. ती वाढवून १००० रुग्णालयात एकूण ९९६ प्रकारच्या आजारांवर उपचार घेण्याची तरतूद केली गेली.
महत्वाची गोष्ट म्हणजे जुन्या योजनेत ज्या आजारांचा फारसा लाभ रुग्णांनी घेतला नाही ते आजार बदलून रुग्णोपयोगी आजारांचा नव्याने समावेश करण्यात आला. केंद्र सरकारच्या युनायटेड इन्शुरन्स कंपनीच्या माध्यमातून ही योजना चालविण्यात येते. या योजनेचे प्रमुख मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधाकर शिंदे यांनी करोना काळात गर्भवती महिलांच्या बाळंतपणासह आवशयक ६७ प्रकारच्या चाचण्या व उपचाराचाही या योजनेत नव्याने समावेश केला. त्याचा फायदा २६ हजाराहून अधिक महिलांना बाळंतपणासाठी मिळाला. याशिवाय महापालिका व शासकीय रुग्णालयात गुडघेबदलासह १२० आजारांचा योजनेत समावेश करण्यात आला. आरोग्यमंत्री राजेश टोपे तसेच आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांचे अंमलबजावणीच्या प्रत्येक टप्प्यावर मोलाचे सहकार्य मिळाल्याने एवढ्या मोठ्या संख्येने रुग्णोपचार होऊ शकले असे डॉ. शिंदे म्हणाले.
करोना काळात महात्मा फुले जन आरोग्य योजनेतील १००० रुग्णालये करोना रुग्णांसह सामान्य रुग्णांवर व्यवस्थित उपचार करतील याची काटेकोर काळजी मुख्य कार्यकारी अधिकारी सुधाकर शिंदे यांनी घेतल्यामुळे २६ हजाराहून अधिक गर्भवती महिलांसह सुमारे सव्वासहा लाख रुग्णांना उपचार मिळू शकले. यासाठीचा खर्च साधारणपणे ६९३ कोटी ७७ लाख रुपये एवढा होणार आहे. यात कॅन्सर रुग्णांना, लहान मुलांचे आजार व शस्त्रक्रिया, मेंदू शस्त्रक्रिया, पोटाच्या, ह्रदयविकारासह अनेक आजारांवर रुग्णांना उपचार मिळाले. राज्यात ६१३ कोव्हिड केअर हॉस्पिटल, १०४० कोव्हिड हेल्थ सेंटरमधून ३,११,२५५ करोना रुग्णांवर मोफत उपचार करण्यात आले असून यातील ७५ हजार रुग्णांचे विमा कागदपत्रे सादर करण्यात आली असून उर्वरित रुग्णांची कागदपत्रे अद्ययावत करण्याची प्रक्रिया सुरु असल्याचे डॉ. सुधाकर शिंदे यांनी सांगितले. त्याचवेळी खाजगी रुग्णालयातून सुमारे दोन लाख खासगी विमाधारकांनी उपचार करून घेतल्याचे विमा कंपन्यांची आकडेवारी सांगते.
Post a Comment