साईचरणी ९ दिवसांत कोट्यवधींचे दान; सहा देशांचे चलनही तिजोरीत!

 



माय अहमदनगर वेब टीम

नगर: राज्य सरकारच्या आदेशाने शिर्डीचे श्री साईबाबा समाधी मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आल्या पासून (१६ नोव्हेंबर) ते काल, मंगळवारपर्यंत सुमारे ४८ हजार २२४ साईभक्तांनी दर्शनाचा लाभ घेतला. तर, याकाळात साईभक्तांकडून विविध प्रकारे ३ कोटी ९ लाख ८३ हजार १४८ रुपये देणगी संस्थानला प्राप्त झालेली आहे. याशिवाय ६४.५०० ग्रॅम सोने व ३८०१.३०० ग्रॅम चांदी संस्थानला देणगी स्वरूपात मिळाली आहे. 

शिर्डी येथील साईबाबा मंदिर उघडल्यापासून ४८ हजार २२४ साईभक्तांनी साईदर्शनाचा लाभ घेतला. यामध्ये टाइम बेस, जनसंपर्क कार्यालय व ऑनलाईन या सेवांचा समावेश असून ऑनलाइन व सशुल्क दर्शन, आरती पासेसव्दारे ६१ लाख ०४ हजार ६०० रुपये प्राप्त झालेले आहेत. तसेच या कालावधीमध्ये श्री साईप्रसादालयामध्ये सुमारे ८० हजार साईभक्तांनी प्रसाद भोजनाचा लाभ घेतला.

१६ नोव्हेंबर ते २४ नोव्हेंबर या कालावधीत रोख स्व‍रूपात एकूण ३ कोटी ९ लाख ८३ हजार १४८ रुपये इतकी देणगी प्राप्त झाली आहे. यामध्ये दक्षिणापेटी मोजणी रुपये १ कोटी ५२ लाख ५७ हजार १०२, देणगी काऊंटर ३३ लाख ६ हजार ६३२ रुपये, डेबीट-क्रेडीट कार्ड, ऑनलाइन, चेक, डीडी, मनी ऑर्डर द्वारे १ कोटी २२ लाख ५० हजार ८२२ रुपये व ६ देशांचे परकीय चलन अंदाजे रुपये १ लाख ६८ हजार ५९२ यांचा समावेश आहे. तर ६४.५०० ग्रॅम सोने व ३८०१.३०० ग्रॅम चांदी संस्थानला देणगी स्वरूपात प्राप्त झालेली आहे.

दरम्यान, करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन लावण्यात आल्यानंतर राज्यात सुमारे आठ महिने सर्व धार्मिक स्थळे बंद ठेवण्यात आली होती. धार्मिक स्थळे खुली करण्यासाठी सातत्याने होत असलेली मागणी व करोनाची सद्यस्थिती लक्षात घेऊन दिवाळीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी धार्मिक स्थळे उघडण्याची दिलासादायक बातमी दिली. सरकारच्या निर्णयानुसार दिवाळी पाडव्यादिवशी म्हणजेच १६ नोव्हेंबर रोजी राज्यातील सर्व धार्मिक स्थळे खुली करण्यात आली. त्यानुसार शिर्डीचं साईमंदिरही भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले. दर्शनासाठी नियमावली तयार करण्यात आली असून त्या नियमांच्या चौकटीत राहून सध्या दर्शन देण्यात येत आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post