डिसेंबरनंतर राज्यात भाजपचेच सरकार; आता 'या' माजी मंत्र्याच्या दावा

 



माय अहमदनगर वेब टीम

अहमदनगर -  'राज्यात पुढची पाच वर्षे सोडूनच द्या, पण आताचीच पाच वर्षेसुद्धा महाविकास आघाडी सरकार टिकणार नाही, हे महाराष्ट्रातील जनता सुद्धा सांगेल. त्यासाठी कोणत्याही भविष्यकाराची आवश्यकता नाही. डिसेंबरनंतर राज्यात भाजपचेच सरकार येईल,' असा दावा माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांनी केला व राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला. 'नगर जिल्ह्यातून भाजपमधून राष्ट्रवादीत कोणीही जाणार नाही,' असेही त्यांनी स्पष्ट केले. ते नगरमध्ये बोलत होते. 

'राज्यामध्ये महाविकास आघाडी सरकार पाच वर्ष पूर्ण करेल, यामध्ये कुठल्याही प्रकारची शंका नाही. उलट आमची पाच वर्षे व्यवस्थित व अशा पद्धतीने पूर्ण होणार आहेत की, पुढची पाच वर्ष आम्ही तिथे असणार आहोत,' असे वक्तव्य राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी सोमवारी नगरमध्ये बोलताना केले होते. तनपुरे यांच्या या वक्तव्याचा माजी मंत्री कर्डिले यांनी खिल्ली उडवली. ते म्हणाले,'पुढची पाच वर्षे तर सोडूनच द्या, पण ही पाच वर्षेसुद्धा राज्यात सरकार टिकेल की नाही? हे महाराष्ट्रातील जनता सुद्धा सांगू शकते. त्यासाठी कोणत्याही पुढाऱ्याची किंवा भविष्यकाराची आवश्यकता नाही,' असे स्पष्ट करताना, 'डिसेंबर नंतर राज्यात भाजपचे सरकार येईल,'असा दावाही त्यांनी केला.

दरम्यान, ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे भाजप मधून राष्ट्रवादीत गेल्यानंतर अनेक आजी-माजी आमदार राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. त्यामध्ये नगर जिल्ह्यातून शिवाजी कर्डिले यांचे नाव आघाडीवर आहे. याबाबत कर्डिले यांना विचारले असता ते म्हणाले, 'खडसे हे जेव्हा भाजपमध्ये होते व ते विरोधी पक्षनेते होते, त्यावेळी माझ्यावर एक संकट आले होते. त्यावेळी मला खोट्या गुन्ह्यात गुंतवण्यात आले होते. तेव्हा अन्यायाच्या विरोधात न्याय देण्याची भूमिका बजावण्यासाठी एकनाथ खडसे नगरमध्ये आले होते. त्यांचे व माझे जवळचे संबंध असल्यामुळे लोक तशी चर्चा करीत असावेत. परंतु ज्या दिवशी खडसे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला, त्याच दिवशी हा सगळा विषय संपला आहे. मला भाजप सोडून कुठल्याही पक्षात जायचे नाही. तसेच मला कोणी संपर्कही केला नाही, व मला त्याची आवश्यकताही नाही.'

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post