माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - 'पाथर्डी तालुक्यात बिबट्याने हल्ला केल्यासारख्या घटना घडल्या. पण तेथे एकही मंत्री भेट देण्यास गेला नाही. एक मंत्री गेले, पण त्यांनीही फक्त त्याच्या मतदार संघातील शिरापुर गावातच भेट दिली, व तिथूनच ते निघून आले. यावरूनच जिल्ह्यामध्ये चार मंत्री असतानाही जिल्ह्याला कुठल्याही प्रकारचा सरकारकडून न्याय मिळत नसल्याचे दिसून येतेय,' असा घणाघात माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांनी केला. ते नगरमध्ये बोलत होते.
पाथर्डी तालुक्यामध्ये बिबट्याने धुमाकूळ घातला असून आतापर्यंत तीन बालकांवर हल्ला करून त्यांना ठार केले आहे. मात्र या नरभक्षक बिबट्याला अद्यापपर्यंत पकडण्यात यश आले नाही. याबाबत आज बोलताना माजी मंत्री कर्डिले यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख व राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांचे नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधला.
'पाथर्डी तालुक्यात तीन ठिकाणी बिबट्याने बालकावर हल्ला केल्याची दुर्दैवी घटना घडली,' असे सांगत कर्डिले पुढे म्हणाले, 'मढी, केळवंडी व शिरापूर या तीन गावातून लहान मुलाला बिबट्याने उचलून नेले. मढी येथील घटना घडल्यानंतर लक्ष दिले असते, तर पुढचा प्रकार हा टाळता आला असता. काल सुद्धा राज्याचे मंत्री यांनी शिरापूर येथे जाऊन भेट घेतली, पण ते मढी व केळवंडी येथे गेले नाही. त्यामुळे ते राज्याचे मंत्री आहेत का आपल्या मतदारसंघाचे ? असा प्रश्न कर्डिले यांनी उपस्थित करताना राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांचा नामोल्लेख टाळत त्यांच्यावर टीका केली.
'जिल्ह्यामध्ये तीन मंत्री आहेत व पालकमंत्री कोल्हापूरचे आहेत. परंतु जिल्ह्याला कुठल्याही प्रकारचा न्याय सरकारकडून मिळत नाही. कारण बिबट्यासारखी घटना घडली, तेव्हा एकही मंत्री भेट देण्यास गेला नाही. एक मंत्री गेले तर त्यांनी फक्त मतदारसंघातील शिरपूर गावात भेट दिली व तेथून ते निघून आले. तसेच करोनाचे देशभर मोठे संकट होते. परंतु नगर जिल्ह्याचा विचार केला तर करोना संकट काळात मंत्र्यांनी कुठेही बैठका घेतल्या नाहीत. कुठल्याही प्रकारचा अहवाल घेतला नाही. डॉक्टर मंडळींवर अंकुश ठेवला नाही. यामुळे बर्यायच मोठ्या प्रमाणात करोनामुळे नगर जिल्ह्यात मृत्यू झालेले आपल्याला पाहण्यास मिळतात, असा आरोपही त्यांनी केला.
Post a Comment