पालकमंत्री उदय सामंत निष्क्रीय ; राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांना ओळखतो कोण?

 माय अहमदनगर वेब टीम

कुडाळ - महाविकास आघाडी सरकारला खाली उतरविण्यासाठी आणि शिवसेनेला सिंधुदुर्ग जिल्ह्यातून तडीपार करण्यासाठी भारतीय जनता पक्षाने योजनाबध्द कार्यक्रम आखला असल्याची माहिती माजी मुख्यमंत्री तथा भाजपचे राज्यसभा खा. नारायण राणे यांनी दिली. सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत यांना सरकारी मेडिकल कॉलेज उभारणीसाठी किती पैसा लागतो हे माहित आहे का? असा सवाल करत पालकमंत्री उदय सामंत हे निष्क्रीय असल्याची टीकाही खा.राणे यांनी केली.


कुडाळ येथील वासुदेवानंद सरस्वती ट्रेड सेंटर येथे खा. नारायण राणे, माजी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत मंगळवारी जिल्हा कार्यकारिणीची बैठक पार पडली. त्यानंतर खा. राणे यांनी पत्रकारांशी संवाद साधला.  माजी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, माजी खा. निलेश राणे, जिल्हाध्यक्ष राजन तेली, आ. नितेश राणे, माजी जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार, अतुल काळसेकर, महिला जिल्हाध्यक्ष सौ. संध्या तेरसे आदी उपस्थित होते. 


खा. राणे म्हणाले, केंद्र सरकारने आत्मनिर्भर योजना देशभर लागू केली आहे. केंद्राच्या विविध योजना जनतेपर्यंत पोहचून भाजप कशा पध्दतीने जनतेसाठी विविध योजना राबवून काम करत आहे आणि आताचे राज्य सरकार एकही काम न करता जनतेची कशा प्रकारे दिशाभूल करत आहे याबाबतचे मार्गदर्शन कार्यकारणीच्या बैठकीमध्ये पदाधिकार्‍यांना केले.  सिंधुदुर्ग जिल्हा दौर्‍यावर येवून गेलेल्या राज्यमंत्री सत्तार यांना मी 40 वर्षे ओळखतो. महसूलमंत्री काँग्रेसचे आणि हे राज्यमंत्री शिवसेनेचे यांना कोण ओळखतंय? असा सवाल यावेळी उपस्थित करत आंबोली येथील कबुलायतदार प्रश्न कसा सुटेल? पंधरा दिवसात हा प्रश्न सुटला असता तर इतकी वर्षे राहिला असता का? खरं तर हा प्रश्न कॅबिनेटमध्ये  जावा लागतो. आंबोली येथील लोकांनी कोर्ट कचेर्‍या  केल्या आहेत त्याचा अभ्यास करणे आवश्यक असल्याचे राणे यांनी सांगितले. 


राणे म्हणाले की, कोकणात सत्तेत असलेले अकरा आमदार आहेत. त्यापैकी एकही आमदार कोकणच्या विकासाबाबत सभागृहात बोलत नाही. कोकणातील पाटबंधारे, रस्ते, शाळा, कोरोना, एअरपोर्ट, सीवर्ल्ड या प्रश्नाबाबत या आमदारांना बोलताना कोणी ऐकलं का? हे सर्व आमदार काहीही करू शकत नाहीत. सिंधुदुर्गचे पालकमंत्री तर निष्क्रीयच आहेत. 1 डिसेंबरला जवळपास पडवे येथील मेडीकल कॉलेज सुरू होत आहे. नियोजीत शासकीय मेडीकल कॉलेजसाठी जमीन, आर्थिक तरतूद परवानग्या मिळणे आवश्यक आहेत. या परवानग्यांचा अधिकार राज्याला नव्हे तर केंद्राला आहे, हे राज्याच्या मुख्यमंत्र्यांना माहीत नाही. मेडीकल कॉलेजसाठी किती पैसे लागतात? हे येथील पालकमंत्र्यांना जरा विचारा, 250 कोटी रूपये हॉस्पिटलसाठी लागतात ते पैसे घोषणा केलेल्या येथील शासकीय मेडीकल कॉलेजसाठी हे सरकार देणार का? असा सवाल राणे यांनी उपस्थित केला. 


राणे म्हणाले की, सिंधुदुर्गात पर्यटकांनी यावे, खर्च करावा तो पैसा येथील जनतेच्या उपयोगात पडावा हा आमचा उद्देश आहे. बंदर विभागाने येथील व्यवसायिकांवर कारवाई करण्याचा प्रयत्न केल्यास त्या व्यवसायिकांना भाजप संरक्षण देईल. त्यावेळी शिवसेना किंवा कोण अधिकारी अडवायला येतात ते आम्हाला पाहायचंच आहे. चिपी विमानतळही आम्हीच सुरू करणार आहोत कारण केंद्रीय मंत्री आमचे आहेत. कोरोना कमी होताच केंद्रीय मंत्र्यांकडे जावून हे विमानतळ सुरू करू. विरोधक विमानतळ चालू करू शकत नाहीत, ते फक्त गणपतीच आणू शकतात असा टोलाही कोणाचेही नाव न घेता लगावला. कोकणातील धरण प्रकल्पही या सरकारने थांबविले. खरं तर कोकणात 774 लघु धरण प्रकल्प मंजूर होते. त्यातील कोकणातील प्रकल्प या सरकारने थांबवले व मध्यम आणि मोठ्या धरणांना पैसेच दिले नसल्याचे राणे यांनी सांगितले. 


भाजप कार्यकारिणीत राज्य शासनाचा निषेध


जिल्हाध्यक्ष राजन तेली म्हणाले की, जिल्हा कार्यकारिणीच्या  बैठकीत राज्यात महिलांवरील अत्याचार प्रश्नी राज्य शासनाचा निषेध करण्यात आला. कामगार कायद्याची माहिती दिली. तसेच येणार्‍या निवडणुकीत शत-प्रतिशत भाजप जिंकेल असा निर्णय घेण्यात आला. मच्छीमारांसाठी पॅकेज आणि भात नुकसानीसाठी केवळ 100 रूपये गुंठा मोबदला या राज्यशासनाच्या निर्णयावरही चर्चा झाली. कृषि विधेयकाबाबतही चर्चा करून सर्वसामान्य जनतेला फायदा होण्यासाठी आत्मनिर्भर भारत योजनेच्या माध्यमातून भाजप प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. 


...तर या सरकार विरोधात आंदोलन उभारू ः राणे


आम्ही ठरवलंय जिल्ह्याचा विकास थांबता कामा नये. हा विकास पूर्ववत चालू राहिला पाहिजे. हे सरकार विकासासाठी काही देणार नसेल तर या सरकारच्या विरोधात प्रसंगी आंदोलन उभारू असा इशाराही खा. नारायण राणे यांनी देत कोकणातील अकराही आमदारांना घरी बसविणार असे ठामपणे सांगितले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post