माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर : कोणत्याही परिस्थितीत ओबीसी प्रवर्गात मराठा समाजाचा समावेश करू नये, अशी मागणी जय भगवान महासंघाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. मराठा समाजाची ओबीसीकरण करू नये व ओबीसीच्या आरक्षणाचे संरक्षण करावे, असेही महासंघाने स्पष्ट केले आहे. नगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घोषणाबाजी करीत जिल्हा प्रशासनाच्या मार्फत तसे निवेदनही महासंघाने मुख्यमंत्री ठाकरे यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार , मंत्री छगन भुजबळ, विजय वडेट्टीवार यांना पाठवले आहे.मराठा आरक्षणाला सुप्रीम कोर्टात स्थगिती मिळाल्यामुळे काही मराठा समाजातील नेते व संघटना जाहीरपणे ओबीसी प्रवर्गात मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी करीत आहे. त्यामुळे ओबीसी व भटके विमुक्त समाजात संतापाची लाट उसळली आहे, असे जय भगवान महासंघाने स्पष्ट करतानाच आपल्या विविध मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना जिल्हा प्रशासनामार्फत पाठवले आहे. या निवेदनामध्ये, कोणत्याही परिस्थितीत ओबीसी या प्रवर्गात मराठा जातीचा समावेश होऊ नये, अशी प्रमुख मागणी महासंघाने केली आहे.
Post a Comment