माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर : श्रीगोंदे विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार बबनराव पाचपुते यांचा कोरोना अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे. त्यांनी याबाबत सोशल मीडियावर पोस्ट टाकली आहे. विधिमंडळ अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर त्यांची चाचणी केली होती. त्याचा अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे.
पाचपुते यांनी म्हटले आहे, की अखेर कोरनाने मला काठलेच. विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या अनुषंगाने मी माझी कोरोना चाचणी केली असता, मी कोरोना पाॅझिटिव्ह असल्याचे आढळून आले आहे. मला कोणतीही लक्षणे नसून, तब्येत ठणठणीत आहे. गेल्या काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्यांनी आपली चाचणी करून घ्यावी आणि शक्यतो डाॅक्टरांचा सल्ला लक्षात घ्यावा. आपल्या सर्वांच्या प्रेमाने आणि आशिर्वादाने मी लवकरच आपल्या सेवेत हजर होईल.
पाचपुते स्वतःच्या निवासस्थानी क्वारंटाईन झाले आहेत. त्यांंना कोरोनाची लक्षणे नाहीत. मात्र त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांनी कोरोना चाचणी करून घेण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
दरम्यान, नगर जिल्ह्यात आतापर्यंत 64 हजार 60 रुग्ण बरे होऊन परतले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.47 टक्के आहे. आज जिल्ह्यात 141 रुग्णांना डिस्चार्ज करण्यात आले असून, 171 रुग्णांना कोरोनाची बाधा झाली आहे. एकूण रुग्णसंख्या 66 हजार 404 झाली आहे.
गेल्या दोन महिन्यांपासून जिल्ह्यात कोरोना रुग्ण कमी होत आहेत. खासगी रुग्णालयांमध्ये सुरू केलेले कोरोना सेंटरही अनेक ठिकाणचे बंद करण्यात आले आहेत. तसेच महापालिका, सेवाभावी संस्थांनी सुरू केलेली कोरोना सेंटरही बंद करण्यात आली आहेत. जिल्ह्यातील सर्व बाजारपेठा नियमितपणे सुरू झाल्या असून, कोरोनाची भिती उरली नसल्याचे चित्र निर्माण झाले आहे. देवस्थाने सुरू झाल्याने लोक पर्यटन करू लागले आहेत. त्यामुळे पर्यटनस्थळांवर गर्दी वाढू लागली आहे. जिल्हा प्रशासनाने प्रत्येक नागरिकांना मास्क सक्तीचे केले आहेत. तसेच सार्वजनिक ठिकाणी गर्दी होणार नाही, याबाबत काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. याबाबत नियम मोडणारांवर कठोर कारवाई करण्यात येत आहे.
Post a Comment